ज्येष्ठ अभिनेता अलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप

0
914

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – ज्येष्ठ अभिनेते अलोकनाथही यांच्यावर प्रख्यात सिरीअल लेखिका विनिता नंदा यांनी बलात्काराचा प्रयत्न केल्याचे आरोप केला आहे.

विनिता यांनी लिहिलेली ‘तारा’ ही मालिका १९९३ मध्ये लोकप्रिय झाली होती. त्याच काळात अलोकनाथ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होते. विनिता नंदा यांनी सोमवारी (दि.८) रात्री फेसबुक पोस्ट लिहून आरोप केले आहेत. पोस्टमध्ये त्यांनी अलोकनाथ यांच्या नावाचा उल्लेख केलेला नसला, तरी तसे थेट संकेत त्यांनी दिले आहेत.

‘त्याची पत्नी माझी बेस्ट फ्रेंड होती. आमचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. मी तारा नावाची मालिका लिहित होते. तो माझ्या मालिकेतील नायिकेच्या मागे होता. तो दारुडा, निर्लज्ज होता, मात्र त्या दशकातील स्टार होता. माझ्या नायिकेला तो सेटवर त्रास द्यायचा, पण सगळे मूग गिळून गप्प होते. तिने आमच्याकडे तक्रार केली तेव्हा आम्ही त्याला काढून टाकायचा निर्णय घेतला. दोघांमध्ये शेवटचा सीन शूट करुन त्याला नारळ दिला जाणार होता, पण त्याला कुणकुण लागली. त्याच दिवशी तो दारु पिऊन सेटवर आला. शॉटला बोलवेपर्यंत तो पित बसला. कॅमेरा रोल होताच तो नायिकेच्या अंगचटीला आला. तिने त्याला कानफटात लगावली. मी सांगितले, यापुढे तू आमच्या कोणत्याही मालिकेत दिसणार नाहीस. नंतर मित्रांच्या मध्यस्थीमुळे आम्ही पुन्हा बोलायला लागलो’ असे विनिता नंदा सांगतात.

‘त्या व्यक्तीने (अलोकनाथ) आपल्या घरी आयोजित केलेल्या पार्टीला मी गेले होते. काही मित्रही तिथे होते. माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळले आहे, असे मला वाटत होते. मला जरा वेगळेच जाणवायला लागले. रात्री दोनच्या सुमारास मी पार्टीतून निघाले, पण कोणीच मला घरी सोडायला येण्याची तयारी दाखवली नाही, हे मला जरा विचित्रच वाटले. तिथे फार काळ थांबणे मला ठीक वाटत नव्हते, त्यामुळे घर लांब असूनही मी पायी जाण्याचे ठरवले’ असे विनिता यांनी पुढे लिहिले आहे.

‘अर्ध्या रस्त्यात असताना त्याने (अलोकनाथ) माझ्याजवळ गाडी थांबवली आणि मला घरी सोडण्याचे आश्वासन दिले. त्याच्यावर विश्वास ठेवून मी गाडीत बसले. त्यानंतर नेमके काय झाले हे मला अंधुक आठवतय. पण माझ्यावर दारु उडवली जात होती आणि माझे लैंगिक शोषण केले जात होते. मी दुसऱ्या दिवशी झोपेतून उठले, तेव्हा वेदनेची जाणीव झाली. माझ्यावर बलात्कार झाला नव्हता, पण माझ्याच घरात लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला होता.’ असा दावा विनिता यांनी केला आहे.