जल संरक्षणासाठी जन आंदोलनाची सुरूवात करा; पंतप्रधान मोदींचे आवाहन  

0
515

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – देशातील कोट्यवधी जनतेचा विकास  करण्यासाठी जनतेने मला सेवा करण्याची पुन्हा संधी दिली आहे,  असे प्रतिपादन  पंतप्रधान मोदी यांनी आज (रविवार) केले आहे. पाण्याचा प्रश्न हा देशासाठी अत्यंत महत्त्वाचा  आहे. पाण्याचा एक एक थेंब वाचवण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत,  असे  मोदी  यांनी स्पष्ट करून जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित केले.  

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकालातील पहिल्याच ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेशी संवाद साधला. मोदींचा आकाशवाणीवरील कार्यक्रम ‘मन की बात’ आजपासून पुन्हा एकदा सुरु झाला असून  पहिल्यांदा त्यांनी जनतेचे आभार मानले.

मोदी म्हणाले की, सध्या देशाचा बहुतांश भाग जल संकटाचा सामना करत  आहे. सर्वांनी जल संरक्षण करण्याची गरज  आहे, असे आवाहन मोदींनी यावेळी केले. लोकांचा सहभाग आणि सहाय्य यांच्या मदतीने जल संकटावर मात करू, असा विश्वासही पंतप्रधानांनी  व्यक्त केला. ज्याप्रकारे देशवासियांनी स्वच्छता अभियानाला जनआंदोलनाचे रुप दिले, त्याचप्रमाणे जल संरक्षणासाठी जन आंदोलनाची सुरूवात करायला हवी. जल संरक्षणाच्या  पारंपारिक पद्धती नागरिकांनी एकमेकांपर्यंत पोहोचवायला हव्यात. जल संरक्षणाचे काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला किंवा संघटनेला जर तुम्ही ओळखत असाल, तर नागरिकांना याबाबत माहिती द्यावी, असे आवाहनही मोदी यांनी केले.

‘जन, जन जुडेगा जल बचेगा’ असा संदेश त्यांनी दिला. देशात केवळ ८ टक्के पाणी वाचवले जाते, पाण्याची समस्या जाणून त्यावर विचार करण्याची गरज  आहे. चित्रपटसृष्टी, प्रसारमाध्यमे, कथा-कीर्तने अशा क्षेत्रात असलेल्या लोकांनी आपापल्या पद्धतीने पाणी वाचवण्याचे अभियान चालवावे,  असे आवाहन मोदींनी केले.

पाण्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून पाण्याच्या समस्येशी संबंधित निर्णय तातडीने घेतले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. २२ जूनला देशातील हजारो ग्रामपंचायतींनी जल संरक्षणाचा संकल्प केल्याचा संदर्भ देत पंतप्रधानांनी झारखंडच्या हजारी बागमधील एका सरपंचाचा संदेशदेखील ऐकवला. पाण्याच्या संरक्षणासाठी लोकांनी #JanShakti4JalShakti या हॅशटॅगचा उपयोग करत सोशल मीडियावर आपला मजकूर अपलोड करावा, असे आवाहनही त्यांनी लोकांनी केले.