आकाश विजयवर्गीयची सुटका, कार्यकर्त्यांनी हवेत गोळीबार करत केला जल्लोष

0
463

इंदूर, दि ३० (पीसीबी) – इंदूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केल्याप्रकरणी तुरंगात असलेले भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांची आज सुटका करण्यात आली. विजयवर्गीय यांची सुटका झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. तसेच कार्यकर्त्यांकडून हवेत गोळीबार देखील करण्यात आला. मात्र या प्रकरणी तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांचे आमदारपुत्र आकाश विजयवर्गीय यांनी इंदूरमध्ये महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. हे कर्मचारी गंजी कंपाउंडमधील मोडकळीस आलेली इमारत तोडण्यासाठी आले असता आकाश यांनी त्यांच्यावर बॅटच्या सहाय्याने हल्ला केला होता.

मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर देखील व्हायरल झाला होता. विभागीय अधिकारी धिरेंद्र बायस यांचा एका भाडेकरूशी वाद सुरु होता. इतक्यात, आमदार आकाश विजयवर्गीय तिथे पोहोचले आणि त्यांचाही अधिकाऱ्यांशी वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आकाश यांनी हातात बॅट घेत धिरेंद्र बायस यांना मारहाण केली.