जबरीचोरी गुन्ह्यातील फरार आरोपीस दिघीतून अटक

0
990

दिघी, दि. १० (पीसीबी) – जबरीचोरीचे दोन गुन्हे करुन फरार झालेल्या एका सराईत चोरट्याला गुन्हे शाखेकडील खंडणी/दरोडा विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई रविवारी (दि.९) दिघीगाव येथील साईपार्क रोड पवार हॉस्पीटलजवळ करण्यात आली.

अविनाश बाळु धनवे (वय २२, रा. वडमुखवाडी, विठ्ठल मंदीराशेजारी, चऱ्होली बुद्रुक, आळंदी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात दिघी आणि आळंदी पोलीस ठाण्यात जबरी चोरी केल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी गुन्हे शाखेकडील खंडणी/दरोडा विरोधी पथकातील पोलीस नाईक निशांत काळे यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, जबरी चोरी प्रकरणी बऱ्याच दिवसांपासून फरार असलेला आरोपी हा दिघीगाव येथील पवार हॉस्पीटलजवळ उभा आहे. यावर खंडणी/दरोडा विरोधी पथकाने तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी अविनाश याला ताब्यात घेतले. त्याची माहिती त्यांनी दिघी पोलिसांना दिली असता तो जबरी चोरी प्रकरणी फरार असल्याचे समजले. पोलिसांनी तातडीने त्याला अटक करुन पुढील कारवाईसाठी दिघी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.