छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान महाराष्ट्र सहन करणार नाही – संजोग वाघेरे‌ पाटील

0
292

– विटंबनेच्या घटनेला जबाबदार कर्नाटक सरकार बरखास्त करा

– पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक

पिंपरी,दि.२०(पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि देशाची अस्मिता आहेत. बंगळुरू येथे झालेली त्यांच्या पुतळ्याची विटंबना आणि अवमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. निवडणुकांमध्ये मते मिळविण्यासाठी भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराजांचे‌ नाव घेतले‌ जाते. त्यांचा अवमान होण्यासाठी जबाबदार असलेले‌ कर्नाटकचे‌ भाजप सरकार केंद्र सरकारने तात्काळ बरखास्त करावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे‌ पाटील यांनी दिला आहे.

कर्नाटक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज पिंपरीतील एचए कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. त्यावेळी ते‌ बोलत‌ होते‌. या प्रसंगी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे, मुख्य संघटक अरुण बो-हाडे, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, माजी उपमहापौर मोहम्मद पानसरे, माजी नगरसेवक अमिना पानसरे, शाम जगताप, विजय लोखंडे, युवकचे विशाल काळभोर, प्रसाद कोलते, युवती शहराध्यक्ष वर्षा जगताप, महिला आघाडीच्या कविता खराडे, सोशल मीडिया सेलचे समीर‌ थोपटे, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अकबर मुल्ला, शकरुला पठाण, सारिका पवार, आजी, माजी नगरसेवक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संजोग वाघेरे‌ पाटील यांनी पुढे म्हणाले की, “कर्नाटकातील बंगळुरु शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार म्हणजे राष्ट्राच्या अस्मितेवरील हल्ला आहे. कर्नाटकात आज भाजपचे सरकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होतो तरी त्याचं गांभीर्य या भाजपच्या सरकारला दिसत नाही. केंद्रात बसलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून निवडणुकीच्या प्रचारात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले जाते. त्यांचे नाव घेऊन मत मिळवण्याचा आटापिटा केला जातो. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांबाबत‌ चकार शब्द काढायला तयार नाहीत.

शिवरायांच्या पुतळा विटंबनेच्या या घटनेचा महाराष्ट्रासह समस्त देशभरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने शिवप्रेमींच्या भावना आणि राष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी तात्काळ या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी. या घटनेला जबाबदार धरून कर्नाटकातील भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि सरकार बरखास्त करावे. तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. याची खबरदारी घ्यावी”, असे संजोग वाघेरे‌ पाटील यावेळी म्हणाले.