छगन भुजबळ राष्ट्रवादीत राहणार; शरद पवारांच्या मनधरणीला यश  

0
585

मुंबई , दि. १४ (पीसीबी) – शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची मनधरणी करण्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांना आज (शनिवार) मुंबईत झालेल्या बैठकीत यश आल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे भुजबळ यांचा शिवसेना प्रवेश बारगळल्याचे निश्चित मानले जात आहे.  

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधण्यात टाळाटाळ करणारे   छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित राहिले.  तसेच त्यांनी  पक्षात सुरु असलेल्या गळतीबाबत चर्चाही केली. त्यामुळे भुजबळांचा  शिवसेना प्रवेश  रद्द झाल्याचे  अधोरेखित  होत  आहे.

याबाबत  भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, माझी  शिवसेना प्रवेशाची होणारी चर्चा  आता    थांबवा.  नेत्यांच्या आऊटगोईंगवर राजे गेले तरी प्रजा सोबत आहे,  असे सांगून भुजबळांनी त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.  त्य़ामुळे आता छगन भुजबळ राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला लागलेली गळती कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर पवारांनी नेत्यांची समजूत काढायला सुरुवात केली आहे. भुजबळांचा शिवसेना प्रवेश रोखण्यात  पवारांना यश आल्याने राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला आहे.