चिनी मालावर बहिष्कार मोहिमेत हे मोठे ५० उद्योजक सहभागी होतील ?

0
270

मुंबई, दि.२५ (पीसीबी) – देशातील सर्व मुख्यमंत्री, राजकारणी, कलाकार आणि क्रिकेटपटूंना चिनी मालावर बहिष्कार टाकण्यासंदर्भात आवाहन केल्यानंतर देशातील सर्वात मोठी व्यापारी संघटना असणाऱ्या ‘कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने (कैट म्हणजेच CAIT ) आता देशातील ५० मोठ्या उद्योजकांनाही या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. मुकेश अंबानी, रतन टाटा, आदी गोदरेज, अजीम प्रेमजी, कुमार मंगलम बिर्ला आणि आनंद महिंद्रांसहीत इतर बड्या उद्योजकांनीही चिनी मालावर बहिष्कार टाकावा अशी मागणी कैटने केल्याचे वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.

कोरोनाचे संकट आणि त्याच वेळी भारत चीन सीमेवरील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कैटने चिनी मालावर बहिष्कार टाकण्यासाची मोहीम सुरु केली आहे. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात १५ जून रोजी भारत आणि चीनच्या लष्करामध्ये झालेल्या हिंसेत भारताचे २० सैनिक शहिद झाले. परिणामी भारत-चीन संबंधात तणाव निर्माण झाला आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी देशवासीयांनी चिनी उत्पादनावर बंदी घालावी, अशी मागणी केली जात आहे. ‘बायकॉट चायना प्रोडक्ट’ या मोहिमेत सर्व स्तरातील प्रभावशाली व्यक्तींनी भाग घ्यावा अशी विनंती कैटने केली आहे.

कैटचे महासचिव प्रवणी खंडेलवाल यांनी उद्योजकांना लिहिलेल्या पत्रामध्ये, “आम्हाला ठाऊक आहे की भारतीय लोक तुमच्याकडे एक यशस्वी उद्योजक म्हणून पाहतात. तुम्ही भारतीय उद्योजकांपैकी प्रमुख व्यक्तींपैकी एक आहात. याच पार्श्वभूमीवर आम्हाला तुमचे मौल्यवान योगदान हवं आहे. आम्ही तुम्हाला विनम्र निवदेन करत आहोत की तुम्ही या आमच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आणि या जन आंदोलनाला पूर्ण पाठिंबा द्यावा. या आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण चित्र बदलणार असून भारत सुपर पॉवर बनण्याच्या स्वप्नाला आकार देणारी ही मोहीम ठरु शकते. या मोहिमेमुळे चीनची मत्तेदारी संपेल,” असं म्हटलं आहे.

“असे अनेक मार्ग आहेत ज्या माध्यमातून तुमची संस्था, कंपनी या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवू शकतात. तुम्ही आम्ही तुमच्या कंपन्या कायमच देशाच्या समर्थनार्थ पुढे आलेल्या आहेत. ही तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. आपला देश आणि त्यासाठी तुमचे समर्थन आम्हाला मौल्यवान आहे. या मोहिमेच्या माध्यमातून उद्योजकांनाही आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी प्रोत्साहन देईल,” असा विश्वास खंडेलवाल यांनी पत्रामध्ये व्यक्त केला आहे.
कैटने ज्या उद्योजकांना हे पत्र पाठवलं आहे त्यामध्ये इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ति, गौतम अदानी, अजय पीरामल, विक्रम किर्लोस्कर, सुनील भारती मित्तल, राहुल बजाज, शिव नाडर, पालोनजी मिस्त्री, उदय कोटक, शशी रुईया, मधुकर पारेख, हर्ष मारीवाला, डॉ, सतीश रेड्डी, पंकज पटेल, नीलेश गुप्ता या बड्या उद्योजकांचा समावेश आहे.