चिंचवडमध्ये डॉक्टरने मेडिकल व्यावसायिकांना घातला ४६ लाखांचा गंडा

0
1772

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – रुग्णालय सुरु करुन एक डॉक्टर आणि त्याच्या मित्राने दोघा मेडिकल व्यावसायिकांना त्या रुग्णालयात मेडिकलचे दुकान टाकण्यासाठी जागा देतो असे सांगितले तसेच वेळोवेळी तब्बल ४६ लाख ६५ हजार रुपये घेतले. मात्र ते रुग्णालय काही दिवस सुरु ठेवून पुन्हा बंद करुन फरार झाले. ही घटना जून २०१६ ते डिसेंबर २०१८ दरम्यान चिंचवड येथील एमआयडीसी ब्लॉकमध्ये घडली.

संतोष पिराजी वरे (वय ३५, रा. आय १० ज्योती अपार्टमेंट सेक्टर ४, मोशी प्राधिकरण) आणि राजेंद्र मारुती बोंबि असे फसवणूक झालेल्या दोघा मेडिकल व्यावसायिकांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, डॉ. प्रमोद तुकाराम बोरघरे (वय ३४, रा. ताकीया वार्ड, शांतीनगर भंडारा) आणि राया आनंदराव भोसले या दोघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०१६ मध्ये आरोपी डॉ. प्रमोद बोरघरे आणि राया भोसले यांनी फिर्यादी मेडिकल व्यावसायिक संतोष वरे यांना चिंचवड येथील एमआयडीसी ब्लॉकमध्ये ‘पीळज्ञास’ नावाचे हॉस्पीटल सुरु करणार असून त्यामध्ये तुला मेडिकल दुकाण टाकण्याची जागा देतो असे सांगितले. आरोपींनी संतोष वारे आणि त्यांचे नातेवाईक राजेंद्र मारुती बोंबि यांच्याकडून वेळोवेळी आरटीजीएस, रोख आणि चेक व्दारे असे तब्बल ४६ लाख ६५ हजार रुपये घेतले. तसेच अचानक रुग्णालय बंद केले आणि बँक खात्यात रक्कम नसलेला चेक देऊन पसार झाले. याप्रकरणी आरोपी डॉ. प्रमोद बोरघरे आणि राया भोसले या दोघांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.