दादांचा राष्ट्रवादीतील प्रवेश कुटुंबासाठी आश्चर्यकारक – सतेज पाटील

0
4312

कोल्हापूर, दि. २४ (पीसीबी) – दादांचा (डॉ. डी. वाय. पाटील) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय कुटुंबासाठी आश्चर्यकारक असून राष्ट्रवादी काँग्रेसने हा निर्णय आमच्या कानावर घालणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी तसे केले नाही, अशी खंत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली आहे. तर यामुळे सतेज पाटील आणि काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

पुण्यात राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत डॉ. डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रविवारी (दि.२३) अधिकृत प्रवेश केला. याबाबत प्रतिक्रिया देताना सतेज पाटील यांनी दादांचा राष्ट्रवादी प्रवेश आश्चर्यकारक आहे, असे सांगून दादा बरेचसे निर्णय स्वतःच्या पातळीवर घेतात, असे ते म्हणाले.

दरम्यान, कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांचे विळ्याचे भोपळ्याचे वैर सर्वश्रुत आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत सतेज यांनी महाडिक यांना लोकसभा निवडणुकीत मदत केली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत महाडिक यांनी आपले चुलत भाऊ भाजपचे आमदार अमल महाडिक यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत सतेज पाटलांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यापासून महाडिक आणि सतेज पाटील यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. तर आता त्यांचे वडील डी. वाय पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने सतेज पाटलांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.