चिंचवडगावात बारमध्ये दारु पिण्यासाठी गेलेल्या एकाच्या चेहऱ्यावर तुटलेल्या काचेच्या ग्लासने वार

0
429

चिंचवड, दि. ३१ (पीसीबी) – बारमध्ये दारु पिणे एकाला चांगलेच महागात पडले. दारु पिताना झालेल्या किरकोळ वादातून दोघा मद्यपींनी मिळून एकाच्या डोक्यात काचेचा ग्लास मारला. तसेच तुटलेल्या काचेच्या ग्लासने त्याच्या चेहऱ्यावर वार करुन लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. ही घटना बुधवार (दि.२९) रात्री साडेआठच्या सुमारास चिंचवडगावातील समाधान बारमध्ये घडली.

विनायक दत्तात्रय मोरे (वय ३६, रा. फ्लॅट क्र.६, शिवहरी अपार्टमेंट पडवळआळी, चिंचवडगाव) असे वार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रोहीत तानाजी गायकवाड (रा. जाधववाडी चिखली) आणि अविनाश निगोजकर (रा. भैरवनाथ मंदीर, चिंचवडगाव) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास विनायक हे मद्य प्राशन करण्यासाठी चिंचवडगावातील समाधान बारमध्ये गेले होते. यावेळी तेथे मद्य प्राशन करण्यास बसलेल्या रोहीत आणि अविनाश यांच्यासोबत विनायक यांचा वाद झाला आणि त्या दोघांनी काचेचा ग्लास विनायकच्या डोक्यात मारला. तसेच फुटलेला ग्लासने विनायकच्या चेहऱ्यावर वार केले आणि पसार झाले. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिस उपनिरीक्षक बामणे तपास करत आहेत.