चाकणमध्ये प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन वाहनचालकाला जबर मारहाण

0
946

चाकण, दि. ८ (पीसीबी) – प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून सात जणांनी एका वाहनचालकाला रॉडने आणि दगडाने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. या घटनेत वाहनचालकाचा पाय देखील फ्रॅक्चर झाला आहे. ही घटना रविवारी (दि.६) सायंकाळी सहा ते पावनेसातच्या दरम्यान चाकण येथील खराबवाडी गावाच्या हद्दीत महादेव पेट्रोलपंपाजवळ घडली.

सुंदर फकीर अप्पा मिरजे (वय २४) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वाहन चालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गणेश तुळवे (रा. खालुंब्रे) आणि त्याच्या सहा साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सुंदर याचे आरोपी गणेश याच्यासोबत त्याच्या वाहनात प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन भांडण झाले होते. या गोष्टीचा राग मनात धरुन गणेश याने सहा साथीदार बोलवून घेतले. तसेच खराबवाडी गावाच्या हद्दीत महादेव पेट्रोलपंपाजवळ गणेश याला अडवून लोखंडी रॉडने जबर मारहाण करत पाय फ्रॅक्चर केला आणि डोक्यात दगडाने मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी गणेश तुळवे आणि त्याच्या सहा साथीदारांविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. चाकण पोलीस तपास करत आहेत.