चाकणमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाचजणांपैकी दोघांना अटक; तीघे फरार

0
1142

चाकण, दि. ५ (पीसीबी) – निघोजे गावाच्या हद्दीतील टाटा डिएलटी कंपनीजवळ दरोडा टाक्याच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांपैकी दोघांचा पाठलाग करुन पोलिसांनी त्यांना अटक केली. तर त्यांचे इतर तीन साथीदार फरार झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि.४) पहाटे अडीचच्या सुमारास घडली.

सुनिल नितीन दाभाडे (वय २५, रा. कोटेश्वरवाडी, तळेगाव), परशुराम शंकर केसापुरे (वय २५, वराळे स्टेशन, समता कॉलनी) असे अटक करण्यात आलेल्या दोघा दरोडेखोरांची नावे आहे. तर त्यांचे तिघे साथीदार राजु दत्तु मराठे (वय २२) ऋषीकेश विलास दाभाडे (रा. माळवाडी, मावळ) आणि एक साथीदार (नाव पत्ता कळू शकलेले नाही) हे फरार होण्यात यशस्वी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास तळेगाव पोलिस, पोलिस ठाणे हद्दीतील निघोजे गावामध्ये गस्त घालत होते. यावेळी टाटा डिएलटी कंपनीजवळ सुनिल, परशुराम, राजु, ऋषीकेश आणि एक अनोळखी इसम संशयीतरित्या टेम्पो घेऊन उभे होते. पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. पोलिस त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांच्याजवळ गेले असता पाचही आरोपींनी तेथून पळकाडण्याचा प्रयत्न केला. यावर पोलिसांनी त्यातील दोन आरोपी सुनिल आणि परशुराम यांचा पाठलाग करुन त्यांना अटक केली. तर त्यांचे इतर तीन साथीदार राजु, ऋषीकेश आणि एक अनोळखी इसम फरार होण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी ट्रकची झडती घेतली असता  ट्रकमध्ये हातोडी आणि लोखंडी कोयता आढळून आला. तसेच  आरोपी सुनिल याच्या कमरेला चाकू आणि परशुराम याच्या खिशात मिरचीची पुढ आणि नायलॉन दोरी सापडली. पोलिसांनी ते साहित्य आणि ट्रक जप्त केला आहे. चाकण पोलिस फरार तिघा आरोपींचा शोध घेत आहेत.