चाकणमध्ये खूनाच्या प्रयत्नातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला

0
1482

चाकण, दि. ६ (पीसीबी) – खूनाच्या प्रयत्नातील आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आरोपीसह त्याच्या नातेवाईकांनी शिवीगाळ केली तसेच, “दंगलीच्या वेळी पोलिसांची काय गत झाली, तशी तुमची दणादण करुन टाकू”, अशी धमकी देऊन धक्काबुक्की करुन हल्ला केला. ही घटना शनिवार (दि.५) दुपारी सव्वाएकच्या सुमारास चाकण येथील रासे गावात घडली.

याप्रकरणी नितीन घोडके (वय २४), संपत काळुराम शिंदे (वय ३१) आणि अनिकेत घोडके (सर्व रा. रासे ता.खेड, जि.पुणे) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, ज्ञानेश्वर सातकर, महिला पोलीस शिपाई सुप्रिया कोहोकडे आणि चालक रजपुत असे वर्दीवर असताना हल्ला झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहे.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, खूनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी अनिकेत घोडके याला शनिवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास चाकण पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, ज्ञानेश्वर सातकर, महिला पोलीस शिपाई सुप्रिया कोहोकडे आणि चालक रजपुत हे अटक करण्यासाठी गेले होते. यावेळी नितीन घोडके त्याचा मामा संपत शिंदे आणि अनिकेतने पोलिसांना शिवीगाळ केली तसेच, “दंगलीच्या वेळी पोलिसांची काय गत झाली, तशी तुमची दणादण करुन टाकू”, अशी धमकी देऊन धक्काबुक्की केली. याप्रकरणी तिघाही आरोपींना अटक करण्यात आली आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.