धनंजय मुंडेंना उत्तर द्यावे, इतके ते मोठे नाहीत – महादेव जानकर

0
721

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – माझ्यावर टीका करणाऱ्या धनंजय मुंडे यांना मी उत्तर द्यावे, इतके  ते मोठे नाहीत. मला उत्तर द्यायचचे असेल, तर मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टीकेला देईल, असा पलटवार  राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केला आहे.  मी स्वतःच्या घरात राहतो, धनंजय मुंडे भाड्याच्या घरात राहतात, अशी टीकाही जानकर यांनी केली आहे.

सांगली येथे आयोजित राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात  जानकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी  बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी धनगर आरक्षण मुद्द्यावरून महादेव जानकर यांना   लक्ष्य केले आहे. यावरून मुंडे  त्यांच्यावर सतत निशाणा साधत आहेत. यावर जानकर यांनी धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, धनगर आरक्षणाबाबत भाजप सरकारने धनगर समाजाला फसवलेले नाही. मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य पातळीवरचा होता, मात्र धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये पाठवण्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच धनगर समाजाला आरक्षण मिळवून देतील, असा विश्वास  जानकर यांनी यावेळी व्यक्त् केला.