चांगले खेळाडू घडविण्यासाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच त्यांच्यासाठी मनुष्यबळही वाढवणार

0
199

नवी दिल्ली,दि.२९(पीसीबी) : क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) ५४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चांगले खेळाडू घडविण्यासाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच त्यांच्यासाठी मनुष्यबळही वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

केंद्रिय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. क्रीडा गुणवत्ता राष्ट्रीय केंद्र (एनसीओई) विविध पातळीवर सक्षम करण्याकडे या बैठकीत सर्वाधिक चर्चा झाली. देशाच्या कानाकोपऱ्यात सर्वोच्च दर्जाची गुणवत्ता केंद्र निर्माण करणे, पायाभूत सुविधांचे नूतनीकरण, हॉस्टेल्स आणि स्वयंपाकघरांचे व्यवस्थापन, क्रीडा शास्त्र उपकरणे उपलब्ध करणे आणि सर्व केंद्रांवर तज्ञ व्यक्तींची नियुक्ती करणे असे विविध निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

खेळाडू केंद्रस्थानी
खेळाडू ही देशाची संपत्ती आणि आपण त्यात गुंतवणूक करत आहोत, त्यामुळे त्यात कुठलीही कमतरता राहणार नाही याची काळजी घेण्याचे स्पष्ट आदेश रिजीजू यांनी या वेळी दिले आहेत. खेळाडूंना सर्व केंद्रांवर सर्वोत्तम दर्जाची राहण्याची व्यवस्था पुरवणे याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाणार आहे. त्याचबरोबर हॉस्टेल्स, मेस आणि किचनच्या सुविधा आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी व्यवसायिक कंपनीला काम देण्याचे या वेळी ठरविण्यात आले. अशा सुविधा निर्माण करताना त्या थ्री-स्टार हॉटेल्सच्या धर्तीवर असतील. याचा पहिला प्रयोग किंवा सुविधा या सर्वप्रथम कर्णीसिंग शूटिंग रेंज आणि जवाहरलाल नेहरु संकुलात सुरू करण्यात येणार आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकविजेते खेळाडू घडविण्यासाठी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना थेट प्रशिक्षक म्हणून आता निवडण्यात येणार आहे. अशा आधारावर द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्यांनाही नियुक्त केले जाणार आहे. त्याचबरोबर रिजीजू यांनी सार्वजनिक क्षेत्रात प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्यांना थेट ‘साई’मध्ये भरती करुन ण्यावरही आज शिक्कामोर्तब करण्यात आले. रिजीजू यांनी यापूर्वीच भारतीय प्रशिक्षकांना राष्ट्रीय केंद्रात भरती करून घेण्याची घोषणा केली होती. त्याचाच एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

पायाभूत सुविधांचे नूतनीकरण
देशभरातील राष्ट्रीय गुणवत्ता केंद्रांमधील पायाभूत सुविधा आणि इमारतीच्या नूतनीकरणासाठी ‘साई’ने १०० कोटी रुपचे मंजूर केले आहेत. यामध्ये बंगळूर, दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियम येथे हॉस्टेल्सची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याबरोबर तेथील क्रीडा सुविधांचेही नूतनीकरण करण्यात येणार आहे.

क्रीडा विज्ञानावर भर
एक चांगला खेळाडू घडविण्यात क्रीडा विज्ञानाचा (शास्त्र) मोठा सहभाग असणार आहे. त्यासाठी प्रत्येक केंद्रात फिजिओथेरपीसाठी लागणारी उपकरणे उपलब्ध करणे, फिजिओथेरपिस्टच्या नियुक्ती आणि प्रशिक्षित डॉक्टर नियुक्त करणे हे काम ‘साई’च्या रडारवर राहणार आहे. पण, पहिल्या टप्प्यात हे काम होणार नाही. दुसऱ्या टप्प्यापर्यंत ही योजना दृष्टिक्षेपात येऊ शकते.