‘चमच्याच्या नशिबात खरकटं राहणंच’, नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी जगताप यांचा सल्ला

0
782

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – झी मराठी वरील ‘कानाला खडा’ या कार्यक्रमामध्ये या आठवड्याला ‘चला हवा येऊ द्या’ पत्र फेम लेखक अरविंद जगताप सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमामध्ये जगताप यांनी बड्या राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या कार्यकर्त्यांसाठी खास संदेश दिला आहे. ‘कार्यकर्ता असण्याचा काळ संपला असून चमचे असण्याचा काळ सुरु झाला आहे’ असे सांगताना कार्यकर्त्यांनी काय करायला हवे याबद्दल जगताप यांनी आपले परखड मत या कार्यक्रमात व्यक्त केले आहे. झी मराठीच्या फेसबुक पेजवर या मुलाखतीमधील जवळजवळ एका मिनिटांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात बोलताना जगताप यांनी कार्यकर्त्यांबद्दल वाईट वाटत असल्याचे मत व्यक्त केले. ‘आज कार्यकर्त्यांची सगळ्यात वाईट अवस्था आहे असे मला वाटते. कार्यकर्ता असण्याचा काळ संपला असून चमचे असण्याचा काळ सुरु झाला आहे. ताटातला गुलाबजाम तो ओठांपर्यंत नेतोय तर तो गुलाबजाम मला मिळालाय असे या चमच्यांना वाटतयं. हिच या चमच्यांची सगळ्यात मोठी अडचण झालीये. पण त्या चमचाचे काम ते कुणाच्या तरी ओठापर्यंत नेणे हे असते. चमच्याच्या आयुष्यात फक्त खरकटं होणे हेच असते. आज चमच्यांची संख्या ऐवढी वाढलीय की (ताटातून ओठापर्यंत नेण्याच्या) एवढ्याश्या प्रवासातच तो समाधानी होतोय. पण त्याला खरकटचं रहावे लागणार आहे आयुष्य. असे असले तरी दोष त्याच्यावर येणार आहे कारण तो खरकटा दिसणार आहे. खाणारा रुमालाने तोंड पुसून निघून जाणार आहे आणि सध्या हेच होत आहे.

कार्यकर्त्यांनी नेत्यांकडून आपली काम करुन घेण्यासाठी काय करावे हेही जगताप यांनी सांगितले आहे. ‘सगळ्यात दुर्देव कार्यकर्त्यांच चमच्यांच हे आहे की तुम्ही मागे फिराल तोपर्यंत तुम्हाला काहीच मिळणार नाही. एक दिवस हा नेता मागे बघेल आणि त्याला दिसेल ना की माझ्या मागे कुणीच नाहीये, एक पण कार्यकर्ता नाहीय त्या दिवशी तो तुमचं काम करायला सुरुवात करेल,’ असे मत जगताप यांनी मांडले.