अमरावतीत ५०० रुपयांच्या ८ बनावट नोटा

0
105

अमरावती : शहरातील बाजारपेठेत पाचशे रुपयांच्‍या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात आल्‍याने व्‍यापारी आणि ग्राहकांच्‍या अडचणीत वाढ झाली आहे.गेल्‍या पंधरा दिवसांत पाचशेच्‍या तब्‍बल २८ बनावट नोटा चलनात आल्‍याचे निदर्शनास आले आहे.येथील जयस्तंभ चौक परिसरातील एका बँकेत ५०० रुपयांच्या ८ बनावट नोटा आढळल्या. या प्रकरणी बँक कर्मचारी श्रीकांत काळे (२१) रा. चांदूरबाजार यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मंगळवारी दुपारी एक ग्राहक ५ लाखांची रक्कम जमा करण्यासाठी जयस्तंभ चौक परिसरातील बँकेत गेला.त्याने सदर रक्कम ही श्रीकांत काळे यांना दिली. त्या रकमेमध्ये ८०० नोटा या ५०० रुपयांच्या होत्या. श्रीकांत काळे हे ती रक्कम मोजत असताना त्यांना त्यातील ८ नोटा बनावट असल्याचा संशय आला. त्यामुळे श्रीकांत काळे यांनी त्या नोटांची पुन्हा पडताळणी केली. मात्र, त्यातून त्या बनावटच असल्याचे आढळून आले. त्यामुळे श्रीकांत काळे यांनी याबाबत आपल्या वरिष्ठांना माहिती देऊन सायंकाळी कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली.

आपल्या बँकेचे ग्राहक रश्मी ट्रेडर्स यांना कुणीतरी अज्ञात ग्राहकाने ५०० रुपयांच्या ८ बनावट नोटा दिल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे, अकरा दिवसांपूर्वी एका बँकेच्या सराफा बाजार येथील शाखेतसुद्धा ५०० रुपयांच्या २० बनावट नोटा आढळून आल्या होत्या. १६ एप्रिल रोजी वेगवेगळ्या तीन खातेदारांनी भरलेल्या रकमेत त्या बनावट नोटा आढळल्याची तक्रार खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. शाखा व्यवस्थापक शशिकांत वारके (४४) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ३ मे रोजी सायंकाळी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

या बनावट नोटांचा कागद आणि रंग हुबेहुब नोटांसारखा असल्‍याने ग्राहकांना ही नोट खरी की खोटी हे कळणे दुरापास्‍त झाले आहे. नोटांचे बंडल व्‍यावसायिकाला दिले, तर त्‍याला त्‍या बंडल मधील बनावट नोट नेमकी कोणती हे समजत नसल्‍याने अनेकांची फसगत होते.
एखाद्या व्‍यवहारातून आपल्‍याकडे जर एखादी संशयास्‍पद नोट आली, तर सर्वप्रथम बँकेत जाऊन मशीनद्वारे त्‍याची सत्‍यता पडताळून पहावी. नोट बनावट निघाल्‍यास स्‍थानिक पोलीस ठाण्‍यात जाऊन यासंदर्भात तक्रार करावी. रिझर्व बँकेच्‍या नियमानुसार, बँकेच्‍या निदर्शनास तुम्‍ही संबंधित नोट आणून दिल्‍यास, त्‍या बदल्‍यात त्‍याच मूल्‍याचे पैसे तुम्‍हाला दिले जात नाहीत. बनावट नोट व्‍यवहारात आणणे किंवा ती फिरवणे हा गुन्‍हा आहे.