चक्रीवादळापूर्वीची सतर्कता; वसई, डहाणू व पालघर तालुक्यात व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश

0
687
जानिये खतरनाक 'निसर्ग' के बारे में सबकुछ: Cyclone nisarga in india

पालघर, दि.३ (पीसीबी) : अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळाच्या संभाव्य धोका लक्षात घेता त्यावर उपाय करण्यासाठी जिल्ह्य़ातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील २२ हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास प्रशासनाने आरंभ केला आहे. याखेरीज वसई, पालघर व डहाणू या तीन तालुक्यांमधील सर्व व्यापारी व औद्योगिक आस्थापने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत.

जिल्ह्याच्या किनारपट्टीवर असलेल्या ६२ गावांपैकी चार तालुक्यांतील २२ गावे चक्रीवादळाच्या तडाख्यात बाधित होण्याची शक्यता असल्याने त्याठिकाणी कच्ची घरे, धोकादायक इमारती तसेच असुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या सुमारे २२ हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे काम मंगळवार सायंकाळपासून हाती घेण्यास सुरुवात केली आहे. खबरदारी म्हणून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दोन तुकडय़ा जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. पालघर व डहाणू येथील किनारपट्टीच्या गावांची त्यांनी पाहणी केली आहे. तीन जून रोजी जिल्ह्य़ातील समुद्रकिनारी असलेल्या वसई, पालघर व डहाणू तालुक्यातील सर्व उद्योग, आस्थापना, सर्व दुकाने, खासगी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. वसई, पालघर, डहाणू तालुक्यांना अतिवृष्टीचा इशारादेखील देण्यात आलेला आहे. चक्रीवादळाच्या अनुषंगाने औद्योगिक आस्थापनांनी कारखान्यांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून योग्य ती दक्षता घ्यावी व त्यामधून कोणतेही रसायन अथवा वायू यांचे उत्सर्जन होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे सूचित करण्यात आले आहे. या कालावधीत तीन तालुक्यांतील अत्यावश्यक सेवा व दुकाने सुरू राहतील असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

स्थलांतरीत निवारा छावणीत
समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या गावामधील चक्रीवादळामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांचे स्थलांतरण निवारा छावण्यामध्ये करण्यात येणार आहे. निवारा छावनीत आसरा देण्यात येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी, अन्न, स्वच्छता व आरोग्य सेवा तसेच औषधांचा योग्य पुरवठा करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. या सुविधा सुरळीतपणे देण्याकरिता सर्व गटविकास अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्याकरिता जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.

अफवांना उधाण
करोनाच्या पार्श्वभूमीवर अफवांनाही उधान आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. पालघर नगर परिषदेने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पालघर नगर परिषद क्षेत्रातील जीवनावश्यक व इतर सेवा तसेच दुकाने ही सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपासून सुरू ठेवण्याचे आदेश दिले असले तरी काही नागरिकांमार्फत नगरपरिषद क्षेत्रात फिरून वादळाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक व इतर सेवा तसेच दुकानांना दहा ते चार वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवा असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांसह हे दुकानदार संभ्रमात पडले आहेत. असे चुकीचे संदेश देणाऱ्या व चुकीच्या अफवा पसरवणाऱ्यावर नगरपालिकेने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
उत्तनमधील दोन हजार नागरिकांचे स्थलांतर
उत्तन किनारपट्टीवर मोठय़ा प्रमाणात नागरिक वास्तव करत आहेत. त्यामुळे अशा साधारण दीड ते दोन हजार नागरिकांना स्थलांतरीत करून वेलंकनी चर्च व सेंट जोसेफ स्कूल येथे राहण्याची सुविधा करण्यात आली आहे.

वसईतील १२ गावांना धोका
चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका वसईतील किनारपट्टीवरील १२ गावांना बसण्याचा धोका वर्तविण्यात येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्यातील चार तालुके प्रभावित होणार आहेत. यामध्ये वसईतील १२, पालघरमधील ५, डहाणूतील ४ आणि तलासरीमधील १ गावाचा समावेश आहे. सर्वाधिक फटका वसई तालुक्यातील चांदीप, पाचूबंदर, सायवन, कामण, ससूननवघर, अर्नाळा, अनाळा किल्ला, रानगाव, सत्पाळा, कळंब, राजोडी, भुईगाव बुद्रुक या १२ गावांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येते. पालघर तालुक्यातील सातपाटी, जलसारंग, मुरबे, उच्छेळी, दांडी ही पाच गावे, डहाणू तालुक्यातील डहाणू, नरपड, आंबेवाडी, चिखले ही चार गावे तर तलासरीमधील झाई गावाला फटका बसण्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.