चक्क त्याने तयार केले विधान परिषदेवर निवडीचे राज्यपालांची सही असलेले बनावट पत्र

0
402

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – सामाजिक कार्यकर्ते यांच्या गाडीवरील चालकाने भलतीच करामत केली आहे. चालक जिथं काम करतो त्या सामाजिक कार्यकर्त्याची विधान परिषदेवर निवड झाली आहे, असे राज्यपालांची सही असलेले बनावट पत्र पठ्याने फसवणूक करण्याच्या उद्देशाने तयार केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी चालकाविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 29 सप्टेंबर रोजी हा प्रकार उघडकीस आला.

प्रमोद ठोंबरे (वय 25, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अजीज नवाब शेख (वय 43, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चालक प्रमोद ठोंबरे हा सामाजिक कार्यकर्ते अजीज शेख यांच्या गाडीवर चालक म्हणून काम करतो. चालकाने शेख यांची निवड विधान परिषदेवर झाली असून त्यावर महाराष्ट्राचे राज्यपालांची सही असलेले बनावट पत्र तयार केले. फसवणूक करण्याच्या उद्देशाने हे पत्र तयार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी चालकाने हे पत्र शेख यांच्या भावाला व्हॉट्सअपवर पाठवले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.