चक्क एका चार्टर्ड अकाउंटंटलाच घातला ४० हजारांचा ऑनलाईन गंडा…

0
247

निगडी, दि. २० (पीसीबी) – निगडी प्राधिकरण येथील एका चार्टर्ड अकाउंटंटने ओएलएक्स या ऑनलाईन खरेदी-विक्री करण्याच्या वेबसाईटवर सोफा विक्रीसाठी टाकला. तो सोफा खरेदी करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने त्यांना क्यू आर कोड पाठवून तो स्कॅन करायला लावून ३९ हजार ९८० रुपयांना ऑनलाईन गंडा घातला.

सत्यरायण त्रिनाथडो (वय ३९, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कन्हैया कुमार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही. मोबाईल क्रमांक 9707343067) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ८ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी अकरा ते साडेअकरा या अर्ध्या तासात घडला. फिर्यादी सत्यनारायण हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यांना नोकरीनिमित्त मुंबई येते शिफ्ट व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या प्राधिकरण येथील घरातील सोफा विक्रीची ओएलएक्स या ऑनलाईन खरेदी-विक्री करण्याच्या वेबसाईटवर जाहिरात दिली.

ती जाहिरात पाहून आरोपी कन्हैया कुमार याने फिर्यादी यांना फोन करून सोफा खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर फिर्यादी यांनी त्याला पाच हजार रुपयांना सोफा विकायचा असल्याचे सांगितले. आरोपीने त्यांना होकार देऊन एक क्यू आर कोड पाठवला. तो क्यू आर कोड फिर्यादी यांनी चार वेळेला स्कॅन केला. त्याद्वारे आरोपीने फिर्यादी यांच्या बँक खात्यातून ३९ हजार ९८० रुपये ऑनलाईन काढून घेतले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.