चंद्रकांत दादा १ लाख १५ हजार मताधिक्याने विजयी होतील – संजय काकडे

0
442

पुणे, दि. ३ (पीसीबी) –  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी आहे.  कोथरुड हा भाजपाचा बालेकिल्ला आहे आणि चंद्रकांत दादा पाटील येथून १ लाख १५ हजार मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास भाजपचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरुड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर आयोजित  कार्यकर्ता मेळाव्यात  काकडे बोलत होते.

काकडे म्हणाले की, चंद्रकांत दादा  पुणे पदवीधर मतदार संघातून गेली १२ वर्षे प्रतिनिधित्व करीत आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी सहा महिने काम केले आहे. त्यामुळे ते बाहेरून आलेत असा आरोप अत्यंत चुकीचा आहे. चंद्रकांत दादा  यांच्या उमेदवारीचा मला वैयक्तिक खूप आनंद आहे. फक्त कोथरुडच नाही तर, संपूर्ण पुणे जिल्ह्याला चंद्रकांत दादांकडून अपेक्षा आहेत, असेही खासदार काकडे म्हणाले.

विरोधकांना आता प्रचारासाठी मुद्दे नाहीत. त्यामुळे ते काहीही आरोप करीत आहेत. आपला प्रत्येक कार्यकर्ता घराघरात पोहचेल आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोथरुड मधून खासदार गिरीश बापट यांना मिळालेल्या मताधिक्यापेक्षा अधिक मताधिक्य आपणांस मिळवून देऊ, असे काकडे यांनी सांगितले.