अमित शहा घुसखोरांना बाहेर केव्हा काढणार ? – शिवसेना

0
517

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित  यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून घुसखोरांना बाहेर फेकण्याची जबाबदारी  स्वीकारली आहे.  प्रत्येक घुसखोराला बाहेर काढू , असे ते आपल्या प्रत्येक भाषणात सांगत आहेत. आता ते गृहमंत्री आहेत. पण प्रश्न इतकाच आहे की, नक्की केव्हा ते घुसखोरांना बाहेर काढणार ?, असा प्रश्न शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून  उपस्थित केला आहे.

सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने एनआरसीवर भाष्य केले आहे.  एकेका घुसखोरास देशाबाहेर फेकू, असे गृहमंत्री अमित शाह यांनी बजावले आहे. अमित शाह यांनीच असे बजावल्याने देशात आता एकही घुसखोर राहणार नाही हे नक्की. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून अमित शाह हेच सांगत आहेत. आता ते देशाचे गृहमंत्री आहेत व घुसखोरांना बाहेर फेकण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. सर्वाधिक घुसखोर प. बंगालात आहेत व तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा या व्होट बँकेवर विशेष लोभ आहे.

एनआरसी झाले तर जे हिंदू वगैरे लोक येथे आले आहेत त्यांनाही देश सोडावा लागेल अशी भीती घालण्यात येत आहे. ती भीती अमित शाह यांनी निराधार ठरवली. आठ दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी दिल्लीत गेल्या. त्या पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाहंना भेटल्या व कोलकात्यात येऊन ममतादीदींनी जाहीर केले, ‘‘प. बंगालात एनआरसी होणार नाही. तसे माझे पंतप्रधानांशी बोलणे झाले आहे.’’ पण आता गृहमंत्री शाह यांनीच या बातमीचे खंडन केले व सांगितले की, ‘‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी कार्यक्रम प. बंगालातही राबवला जाईल. अफवांवर विश्वास ठेवू नका.’’ राज्याराज्यांत बेकायदा निवास करणाऱ्यांना आधी हुडकून काढायचे व नंतर देशाबाहेर फेकायचे ही मोहीम जोरदार आहे. श्री. शाह म्हणतात, प्रत्येक घुसखोराला बाहेर काढू. प्रश्न इतकाच आहे की, नक्की केव्हा?,” या प्रश्नाला शिवसेनेने उत्तर मागितले आहे.