घरासमोर बॅडमिंटन खेळण्यास रोखल्याने एकाला बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

0
237

थेरगाव, दि. २९ (पीसीबी) – घरासमोर बॅडमिंटन खेळू नका असे म्हटल्याने तीन जणांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 27) रात्री नऊ वाजता समता कॉलनी, थेरगाव येथे घडली.

अनिल विठ्ठल रोकडे (वय 51, रा. समता कॉलनी, थेरगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत बुधवारी (दि. 28) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संकेत इंगळे, रोहन गायकवाड, शुभम गायकवाड (सर्व रा. थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंगळवारी रात्री फिर्यादी रोकडे यांच्या घरासमोर बॅडमिंटन खेळत होते. त्यामुळे रोकडे यांनी आरोपींना घरासमोर बॅडमिंटन खेळू नका असे म्हटले. त्यावरून आरोपी संकेत याने रोकडे यांना बरगडीवर मारून जखमी केले. रोहन याने हाताला मारून जखमी केले. तर शुभम याने डोक्यात धारदार शस्त्राने मारून जखमी केले. मारहाण केल्यानंतर आरोपींनी रोकडे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.