गौतम गंभीर भाजपकडून विधानसभा लढवणार ?  

0
1251

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – भारताचा डावखुरा फलंदाज गौतम गंभीर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून सध्या लांब आहे. मात्र, गंभीर आपली नवीन इनिंग राजकीय पीचवरून सुरु करण्याच्या विचारात आहे. तो  भाजपमध्ये प्रवेश करून    आगामी दिल्ली विधानसभा निवडणूक  लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.   दिल्ली भाजप गौतम गंभीरला उमेदवारी  देण्यासाठी इच्छुक आहे,  असेही बोलले जात आहे.

दिल्लीत आपली प्रतिमा सुधारण्यासाठी भाजप एका चांगल्या चेहऱ्याच्या शोधात आहे. दिल्ली भाजपमध्ये निरूत्साह वाढला  आहे. अशा परिस्थितीमध्ये पक्षाला सावरण्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांची गरज आहे. त्यासाठी गौतम गंभीर करत असलेल्या कामाचा फायदा भाजप घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपनेही गौतमला पक्षात  येण्यासाठी पायघड्या घातल्या आहेत.

२०१६  मध्ये कसोटी सामन्यात गौतम गंभीर अखेरचा खेळला होता. २०१२ नंतर गौतम गंभीर भारताकडून एकही मर्यादीत षटकांचा सामना खेळलेला नाही. यंदाच्या आयपीएल मोसमातही त्याला आपल्या लौकीकाला साजेशा खेळ करता आला नव्हता. त्यामुळे त्याला बाहेर बसावे लागले होते. दरम्यान, भाजप प्रवेशाच्या वृत्तावर गौतम गंभीरने अद्याप कोणतीही  प्रतिक्रीया दिलेली नाही. त्यामुळे आता तो नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.