गोविंदा पथकाच्या थरांवर बालगोविंदा आढळल्यास पालकांवरही कारवाई

0
381

मुंबई, दि. २ (पीसीबी) – उंच दहीहंडी फोडणाऱ्या थरांमध्ये १४ वर्षांखालील मुला-मुलींना सहभागी करण्यास पूर्णपणे बंदी असल्याने यंदा पोलिसांकडून त्यावर करडी नजर ठेवली जाणार आहे. कोणत्याही गोविंदा पथकाच्या थरांवर बालगोविंदा आढळल्यास त्या पथकासोबतच संबंधित मुलांच्या पालकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर २०१४ सालापासून दहीहंडीवर निर्बंध आले होते. त्यानंतर दोन-तीन वर्षे हंडीची उंची व गोविंदांच्या वयोमर्यादेवरील अटींविषयी संभ्रमाची स्थिती राहिल्यानंतर उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी नव्याने आदेश देऊन चित्र स्पष्ट केले. त्यानुसार, हंडीच्या उंचीवरील निर्बंध हटवण्यात आल्याने गोविंदा पथके कितीही थर लावू शकतात, हे स्पष्ट झाले. मात्र, त्याचवेळी १४ वर्षांखालील गोविंदांना थरांमध्ये सहभागी होता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे यंदा मुंबई, ठाणे, पुण्यासह अन्य शहरांतील आयोजक तसेच गोविंदा पथकांपर्यंत न्यायालयाच्या आदेशाविषयीचे स्पष्ट चित्र पोहोचले आहे. त्याचबरोबर पथके व आयोजकांना परवानगी देण्यापूर्वी या अटींसोबतच १४ वर्षांखालील मुला-मुलींना थर लावण्यास बंदी असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.