गिरीश महाजनांची विनंती अण्णा हजारेंनी फेटाळली; उपोषणावर ठाम  

0
575

अहमदनगर, दि. १५ (पीसीबी) – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे  लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर २ ऑक्टोबरपासून राळेगणसिद्धी येथे उपोषण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धीत येऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सरकारच्या वतीने घेतलेल्या निर्णयांची माहिती देत उपोषण न करण्याची विनंती केली. मात्र, सरकार केवळ आश्वासने देत आहेत, असे सांगत  अण्णांनी आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले.

अण्णांना आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी सरकारने प्रय़त्न असून  त्यासाठी महाजन राळेगणसिद्धीत आले होते. भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून आपण आल्याचे त्यांनी सांगितले. सुरवातीला दोघांमध्ये बंद खोलीत चर्चा झाली. त्यानंतर दोघांनीही स्वतंत्रपणे चर्चेचा तपशील जाहीर केला.

यावेळी महाजन म्हणाले की, ‘हजारे यांच्या मागण्यांसंबंधी सरकार सकारात्मक आहे. त्यासंबंधी आतापर्यंत घेतलेल्या पूरक निर्णयांची माहिती हजारे यांना दिली. लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी पूर्वीच निर्णय घेतला  आहे. याशिवाय अन्य मागण्यांवर कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे हजारे यांनी उपोषण करू नये, अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे. अण्णांच्या ६० ते ७० टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे अण्णा उपोषण करणार नाहीत, असा  आम्हाला विश्वास  वाटतो, असे महाजन यांनी सांगितले.