गडकरी आणि फडणवीस आमच्यासाठी सारखेच!-संजय राऊत

0
702

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – नितीन गडकरी असोत की देवेंद्र फडणवीस दोघे आमच्यासाठी सारखेच आहेत अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत आहेत. महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झालेला असताना संजय राऊत हे सातत्याने शिवसेनेची भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडत आहेत. सोमवारी त्यांनी राज्यपालांचीही सदीच्छा भेट घेतली. दरम्यान सोमवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी गडकरींचीही भेट घेतली. याबाबत राऊत यांना विचारले असता गडकरी आणि फडणवीस आमच्यासाठी सारखेच असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

गडकरी आणि फडणवीस आमच्यासाठी सारखेच असे संजय राऊत यांनी म्हणण्यामागे नेमके काय कारण असावे? याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेनेने सत्तेत अर्धा वाटा मागितला असून मुख्यमंत्रीपदावरही अडीच वर्षांसाठी दावा सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. भाजपाने राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. शिवसेना आमच्याकडे भाजपाशिवायही पर्याय आहे असे सांगते आहे. अशात आता संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा अर्थ काय याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नितीन गडकरी मुख्यमंत्री होऊ शकतात अशी चर्चा संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे सुरु झाले आहेत. संपूर्ण निवडणूक देवेंद्र फडणवीस यांना समोर ठेवून लढवण्यात आली आहे. मात्र अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस हे गडकरींच्या भेटीलाही गेले होते. या दोघांची भेट होणे आणि संजय राऊत यांनी असे वक्तव्य करणे याचे विविध अर्थ काढले जात आहेत. सरकार स्थापनेच्या या घडामोडींमध्ये नेमके काय होणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.