गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक

0
513

चिखली, दि. १५ (पीसीबी) – गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली. या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. आकाश उत्तम शिनगारे (वय 23, रा. मोरेवस्ती चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 14) गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस चिखली परिसरात गस्त घालत असताना पोलीस शिपाई सचिन मोरे यांना माहिती मिळाली की, चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तीन गंभीर गुन्ह्यात फरार असलेला आरोपी चिखली परिसरात फिरत आहे. पोलिसांनी त्याला शिताफीने पकडून चिखली पोलिसांच्या ताब्यात दिले.

आरोपी आकाश याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून पती-पत्नीला कोयत्याने मारहाण करून पत्नीच्या हातातील पर्स जबरदस्तीने हिसकावून नेली होती. दुसऱ्या गुन्ह्यात आरोपीने एकाकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्या व्यक्तीने दारू प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून आरोपी आकाश याने त्याला लाथाबुक्क्यांनी आणि कोयत्याने मारून जखमी केले. तिसऱ्या गुन्ह्यात कार चालकाला मारहाण करत आरोपी आकाश याने त्याचे दात पाडले.
आरोपी आकाश हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरूध्द निगडी, भोसरी, चिखली, खडक या पोलीस ठाण्यात दंगल घडविणे, चोऱ्या, मारामारी गंभीर दुखापत, जबरी चोरी, शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे असे एकुण 20 गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधिर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त(गुन्हे) आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, सहाय्यक फौजदार रविंद्र गावंडे, सुभाष सावंत, पोलीस कर्मचारी मारूती जायभाये, अजंनराव सोडगिर, विजय मोरे, सचिन मोरे, प्रमोद गर्जे यांच्या पथकाने केली आहे.