खोटे दस्त तयार करुन दिराने बळकावले विधवा वहिनीचे घर; ११ महिने झाले तरी पोलिसांकडून आरोपींवर कारवाई नाही

0
1046

पुणे, दि. १९ (पीसीबी) – एसआरए प्रकल्पाअंतर्गत एका विधवेला मिळालेले घर तिच्या दिरानेच खोटे दस्त तयार करुन बळकावल्याची घटना समोर आली आहे. इतकेच नव्हे तर त्याने ते घर ११ महिन्यांच्या भाडेतत्वावर देखील दिले. हे समजताच पीडितेने भाडेकरु आणि तिच्या दिराला याचा जाब विचारला असता त्या दोघांनी या विधवेला अश्लिल शिवीगाळ करुन जीवेमारण्याची धमकी देत हाकलून लावले. ही घटना फेब्रुवारी २०१८ मध्ये गंजपेठ, पुणे येथे घडली.

निर्मला बापु कसबे (रा. १०२, स्वप्नपुर्ती गृहरचना संस्था, गंजपेठ, महात्मा फुले पेठ, पुणे) असे या पीडितेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी दिर दिपक मल्हारी कसबे आणि भाड्याने त्यांच्या घरात राहणारा श्रीकांत राजाराम बिटला या दोघांविरोधात ८ फेब्रुवारी २०१८ रोजी खडक पोलीस ठाण्यासह पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र ११ महिने उलटून देखील महिलेला तिच्या घराचा ताबा देण्यात आला नसून पोलीसांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही.

पीडित निर्मला यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नपुर्ती गृहरचना संस्था, गंजपेठ, महात्मा फुले पेठ, पुणे येथील रुम नं.३०२ हे घर त्यांना एसआरए प्रकल्पा अंतर्गत मिळाले होते. या घराचे सर्व कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत. काही घरघुती कारणामुळे त्यांनी त्या घराला कुलुप लावून पिंपरीतील देहुरोड येथे राहण्यासाठी गेल्या होत्या. घराची पाहणी करण्यासाठी त्या ७ फेब्रुवारी २०१८ ला गंजपेठ येथील त्यांच्या घरी गेल्या. यावेळी त्यांच्या घराचे कुलुप तोडून दिर दिपक कसबे यांनी ते श्रीकांत बिटला या इसमाला ११ महिन्यांच्या करार पध्दतीवर भाड्याने दिल्याचे समजले. यावर निर्मला यांनी त्या दोघांना याचा जाब विचारुन घर खाली करण्यास सांगितले असता दिपक आणि श्रीकांत या दोघांनी त्यांना शिवीगाळ करुन हाकलून लावले. तसेच हे घर आमचे आहे, आमची खूप ओळख आहे. माझे कुणीच काही वाकडे करु शकत नाही आणि परत जर इथे आलीस तर मारुन टाकीन अशी धमकी दिली. यावर घाबरलेल्या पीडितेने याबाबत ८ फेब्रुवारी २०१८ रोजी खडक पोलीस ठाण्यासह पुणे पोलीस आयुक्तांकडे मल्हारी आणि श्रीकांत विरोधात तक्रार अर्ज दाखल केला. मात्र त्या दोघांवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. तसेच पोलीस ठाण्यातून उडवाउडवीची उत्तर मिळत असल्याचे निर्मला यांनी पीसीबीसोबत बोलताना सांगितले.

दरम्यान, या सर्व प्रकारामुळे पुणे पोलीस प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्हे उपस्थित होत आहेत. तर आरोपी आणि पोलीसांचे लागेबांधे असल्याचे बोलले जात आहेत. पीडितेने लवकरात लवकर आरोपींवर कारवाई करुन माझे घर मला मिळवून द्यावे अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. आता पोलीस प्रशासन या प्रकरणी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.