खासदार उदयनराजेंचे काम करणार नाही; आमदार शिवेंद्रराजे गटाची ठाम भूमिका

0
508

सातारा, दि. १८ (पीसीबी) – खासदार उदयनराजे भोसले यांची  साताऱ्यातून राष्ट्रवादीकडून लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. तर दुसरीकडे आमदार शिवेंद्रराजे भोसले गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारीली कडाडून विरोध केला आहे. यामुळे साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे.  

आमदार शिवेंद्रराजे यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी बारामतीत जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची  भेट घेतली. यावेळी  त्यांनी उदयनराजेंच्या उमेदवारीला कडाडून विरोध  करून त्यांचे काम करणार नसल्याचे स्पष्ट केले. स्वत: शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंचे काम आम्ही करणार नाही, असे पवारांना सांगितले.

खासदारांची वेळ आली की, रडारडी करतात, आमची वेळ आली की पाडापाडी करतात, अशा शब्दांत शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांनी पवारांजवळ तक्रारीचा पाढा वाचला. यामुळे साताऱ्याच्या राजकारणात  खळबळ उडण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवेंद्रराजेंसह सर्वच आमदारांना विचारल्याशिवाय आपण कोणताही निर्णय घेणार नाही, असे आश्वासन पवारांनी दिले.