खासदार आढळराव पाटलांकडून पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे गाजर; वरातीमागून घोडे दामटण्याचा प्रकार असल्याची राष्ट्रवादीच्या चंदन सोंडेकरांची टिका

0
580

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी “बुस्टर डोस” ठरणारा पुणे-नाशिक रेल्वे मार्ग सलग चौथ्या निवडणुकीत प्रचाराचा प्रमुख मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातून तब्बल तीन टर्म म्हणजे १५ वर्षे खासदारकी उपभोगणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आगामी निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा “पुणे-नाशिक रेल्वे मार्गा”चे गाजर बाहेर काढले आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या चंदन सोंडेकर यांनी खासदार आढळराव पाटील यांच्यावर टिका केली आहे. खासदार आढळराव पाटील यांची खासदारकीची तिसरी टर्म तीन महिन्यांत संपणार आहे. पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचा शिरूर मतदारसंघात चुना लावलेला एकही दगड दिसत नाही. असे असताना केवळ एक डिजीटल नकाशा सोशल मीडियावर फिरवून या रेल्वे मार्गाचे गाजर दाखवण्याचा खासदार आढळरावांचा प्रयत्न म्हणजे वरातीमागून घोडे दामटण्याचा प्रकार असल्याची टिका सोंडेकर यांनी केली आहे. सोंडेकर हे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत.