खासदार आढळराव पाटलांकडून पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे गाजर; वरातीमागून घोडे दामटण्याचा प्रकार असल्याची राष्ट्रवादीच्या चंदन सोंडेकरांची टिका

0
2721

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी “बुस्टर डोस” ठरणारा पुणे-नाशिक रेल्वे मार्ग सलग चौथ्या निवडणुकीत प्रचाराचा प्रमुख मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातून तब्बल तीन टर्म म्हणजे १५ वर्षे खासदारकी उपभोगणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आगामी निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा “पुणे-नाशिक रेल्वे मार्गा”चे गाजर बाहेर काढले आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या चंदन सोंडेकर यांनी खासदार आढळराव पाटील यांच्यावर टिका केली आहे. खासदार आढळराव पाटील यांची खासदारकीची तिसरी टर्म तीन महिन्यांत संपणार आहे. पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचा शिरूर मतदारसंघात चुना लावलेला एकही दगड दिसत नाही. असे असताना केवळ एक डिजीटल नकाशा सोशल मीडियावर फिरवून या रेल्वे मार्गाचे गाजर दाखवण्याचा खासदार आढळरावांचा प्रयत्न म्हणजे वरातीमागून घोडे दामटण्याचा प्रकार असल्याची टिका सोंडेकर यांनी केली आहे. सोंडेकर हे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत.

शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा नेतृत्व केले आहे. राष्ट्रवादीतील गटबाजीचा पुरेपूर लाभ उठवत खासदार आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात सलग तीन वेळा शिवसेनेचा खासदार होण्याचा विक्रमच केला आहे. सलग १५ वर्षे खासदार राहिल्याने आढळराव पाटील यांना केंद्राच्या योजना, निधी आणून शिरूर लोकसभा मतदारसंघात चमकदार कामगिरी करण्याची संधी प्राप्त झाली होती. परंतु, त्यात ते कितपत यशस्वी झाले आहेत? असा प्रश्न विचारल्यास मतदारांच्या पदरी निराशाच पडल्याचे दिसते. परंतु, निवडणूक जवळ आली की प्रचार यंत्रणा अधिक लोकाभिमुख करून त्यावर स्वार होत विजय सहज प्राप्त करण्यात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राजकीय पीचडी प्राप्त केल्याचे पाहायला मिळते.

खासदार आढळराव पाटील हे इरेक्शन मॅनेजमेंट गुरू असल्याने त्यांचा पराभव करणे विरोधकांना आजपर्यंत जमलेले नाही. आगामी निवडणुकीतही शिरूर मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांचेच पारडे जड असेल, असा राजकीय निरीक्षकांचा अचूक अंदाज आहे. स्वतः आढळराव पाटील यांनी आगामी निवडणुकीची प्रचार यंत्रणा लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. त्यातूनच त्यांनी प्रचारात कळीचा मुद्दा ठरणाऱ्या पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या प्रलंबित प्रश्नांवर पत्रकार परिषद घेत लवकरच या मार्गाच्या कामाची निविदा प्रसिद्ध होणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु, या मार्गाचे भूसंपादन अजूनही शंभर टक्के पूर्ण झाले नसल्याचे त्यांनी याच पत्रकार परिषदेत मान्य केले आहे. भाजपने एखाद्या विकासकामाचे आश्वासन दिले की त्याला गाजराची उपमा देणाऱ्या आढळराव पाटील यांनीही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या मतदारसंघातील मतदारांना पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे गाजर दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.

याच मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या चंदन सोंडेकर यांनी खासदार आढळराव पाटील यांच्यावर कडवी टिका केली आहे. खासदार आढळराव पाटील यांनी तब्बल १५ वर्षे खासदार म्हणून मतदारसंघाच्या विकासासाठी काय केले? हे दुर्बिण लावून शोधावे लागेल, अशी भयावह परिस्थिती आहे. आता निवडणूक जवळ आल्यानंतर आढळराव पाटील यांनी पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे गाजर बाहेर काढले आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणाचा चुना लावलेला एकही दगड मतदारसंघात नाही. असे असताना आढळराप पाटील या रेल्वे मार्गाचा एक डिजीटल नकाशा सोशल मीडियावर फिरवून चौथ्यांदा खासदार होण्याचे स्वप्न पाहत आहेत. खासदारकीची तिसरी टर्म दोन महिन्यांवर संपत आली असताना शिरूर मतदारसंघातील जनतेला गाजर दाखवण्याचा आढळरावांचा हा प्रयत्न म्हणजे वरातीमागून घोडे दामटण्याचा प्रकार आहे. परंतु, या मतदारसंघातील जनता आता जागरूक झाली आहे. बैलगाडा शर्यतीच्या नावाने तीन टर्म खासदारकी काढलेल्या आढळराव पाटील यांच्या पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या भूलथापांना आता नागरिक बळी पडणार नाहीत. आगामी निवडणुकीत शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीचा खासदार निवडून आल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे भूमीपूजन आणि उद्घाटन होणार असल्याची टिका सोंडेकर यांनी केली आहे.