खळबळजनक…. घरकुलमधील ४२ सदनिका बळकावल्याच्या प्रकऱणात भाजपाच्या माजी नगरसेवकासह २४ जणांवर गुन्हा

0
681

पिंपरी, दि.२६ (पीसीबी) – पालिकेकडून वाटप न झालेल्या सदनिकांचा बेकायदेशीरपणे ताबा घेतल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक भीमा बोबडे यांच्यासह 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोबडे यांच्या पत्नी महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या नगरसेविका आहेत.

चिखली घरकुल येथे महापालिकेने स्वस्त घरकूल प्रकल्प उभारला आहे. सुमारे सात हजार घरांच्या या प्रकल्पात पालिकेकडून वाटप न झालेल्या सदनिकांचा बेकायदेशीरपणे ताबा काही लोकांनी घेतल्याचे निदर्शनास आले होते. महापालिका अधिकाऱ्यांनी त्याचा खात्री करून घेतली आणि सदनिकांचा ताबा घेतल्या प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकासह 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिखली येथे शनिवारी (दि. 25) दुपारी घडली.

माजी नगरसेवक भीमा सखाराम बोबडे (रा. यमुनानगर, निगडी), युवराज सूर्यभान कोकाटे (रा. नेवाळे वस्ती, चिखली), अशोक रामभाऊ धोंडे, धन्यकुमार अंकुशराव पुजारी, निवृत्ती कृष्णा पवार, भगवान लिंबाजी लांडगे, विजय बळीराम गायकवाड, भगवान दगडू कांबळे, वसंत लक्ष्मण गुरव, सूर्यकांत मलप्पा बनसोडे, शिवाजी हनुमंत जाधव, नवनाथ रामचंद्र फडतरे, विजय नारायण जोगदंड, बालाजी गोरोबा शिखरे, बालाजी विश्वनाथ गायकवाड, अशोक सखाराम चव्हाण, भिकु महादेव पोहाडे, देवानंद सदाशिव खांबे, सुरेंद्र त्रिंबकराव ढोणे, रवींद्र माणिकराव बोरकर, राम व्यंकटी गायकवाड अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

गजानन मारुती गावडे (वय 37 रा. धायरी पुणे) यांनी शनिवारी (दि. 24) याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गावडे हे बांधकाम व्यवसायिक असून त्यांनी घरकुलाच्या इमारतीचे बांधकाम केले आहे. मात्र या घराचे महापालिकेकडून अधिकृत वाटप झालेले नाही. आरोपींनी आपसांत संगनमत करून डी-12 येथील इमारतीचा बेकायदेशीरपणे ताबा घेऊन 42 सदनिकांचा ताबा घेतला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.