‘क्रूझ ड्रग्ज पार्टी’ प्रकरणामध्ये ज्यांना सोडण्यात आलं, त्यांच्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘एका’ मोठ्या नेत्याच्या मुलाचा….

0
414

मुंबई, दि.१० (पीसीबी) : मुंबईतील क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात रोज नवनवे ट्विस्ट येताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपल्या पत्रकार परिषदांमधून अनेक गंभीर आरोप करत एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले असताना दुसरीकडे एनसीबीकडून देखील त्यावर खुलासे करण्यात आलेले आहेत. एनसीबीनं ज्या तीन व्यक्तींना सोडलं, त्यामध्ये भाजपा नेते मोहित कंबोज यांचा मेहुणा रिषभ सचदेव देखील होता, त्याला का सोडण्यात आलं? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. यानंतर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया दिली जातेय, याची चर्चा सुरू झाली आहे.

नागपूरमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्ज पार्टी प्रकरणाविषयी आपली भूमिका मांडली. “एनसीबीने स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्यांना ते एकत्र घेऊन गेले होते, त्यापैकी जे क्लीन होते, त्यांना सोडून देण्यात आलं. ज्यांच्याकडे काही सापडलं किंवा ज्यांच्या मेसेजेसमध्ये काही सापडलं, अशा लोकांना अटक करण्यात आली. हे ड्रग्ज आपल्या समाजाला, आपल्या मुलांना बिघडवत आहे. याचं राजकीयीकरण करणं हे खूप चुकीचं आहे”, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका बड्या नेत्याच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. “ज्यांना सोडण्यात आलं, त्यांच्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याच्या मुलाशी संबंधित व्यक्तीला देखील सोडलं आहे. पण आम्ही त्यांचं नाव यासाठी घेत नाही आहोत कारण ते क्लीन होते. त्यांचं नाव घेऊन आम्ही त्यांना बदनाम का करावं? त्यमुळे मला वाटतं की यावर राजकारण होऊ नये. आपल्या मुलांना बिघडवणारी ही ड्रग्जची वाईट सवय आहे, त्याच्याशी लढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवं असं मी मानतो”, असं ते म्हणाले.

दरम्यान, नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर एनसीबीनं देखील पत्रकार परिषद घेऊन त्यावर आपली बाजू मांडली आहे. यावेळी सोडून देण्यात आलेल्या सहा जणांमध्ये उपमुख्यमंत्र्यांचे पुत्र असणारे पार्थ पवार होते का? असा थेट प्रश्न एनसीबीच्या अधिकाऱ्यांना पत्रकारांनी विचारला असता वानखेडे यांनी यावर उत्तर दिलं. “तुम्ही जी नावं विचारत आहात त्यावर एकच सांगू शकेल की प्रकरणाचा तपास सुरु आहे तर नावं सांगणं योग्य ठरणार नाही. आम्ही फार जबाबदार संस्थेसाठी काम करतो. आम्ही असं कोणतंही वक्तव्य करु शकणार नाही. आम्ही फक्त पुरव्यांच्या आधारे बोलतो.” असं वानखेडे म्हणाले