क्रीडा नगरी म्हणून पिंपरी चिंचवडचा देशभर नावलौकिक व्हावा-खासदार श्रीरंग आप्पा बारणे

0
2

महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सत्कार

पिंपरी, दि. १०(पीसीबी) पिंपरी चिंचवड ही नगरी कबड्डी खेळाची पंढरी आहे. येथून अधिकाधिक राष्ट्रीय खेळाडू घडावेत आणि क्रीडा नगरी म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नाव देशभरात नावलौकिक मिळावा, असे प्रतिपादन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी केले. प्रो कबड्डीच्या माध्यमातून खेळाडूंना मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. भविष्यात अधिकाधिक खेळाडूंनी या क्षेत्रात यश संपादन करावे, असे देखील त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना सांगितले.

महापौर रवि लांडगे यांच्या संकल्पनेतून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२६ चे भोसरी येथील गावजत्रा मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी महापौर रवि लांडगे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसदस्य तथा शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, नगरसदस्य निलेश तरस, नगरसदस्या सुलभा उबाळे, उपायुक्त पंकज पाटील, क्रीडा अधिकारी रंगराव कारंडे, क्रीडा पर्यवेक्षक दीपक कन्हेरे, क्रीडा पर्यवेक्षक अरुण कडूस यांच्यासह क्रीडाप्रेमी व नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते विविध क्रीडा प्रकारातील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यामध्ये बॉक्सिंगमधील १९९७-९८ चे शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय यादव, कबड्डीमधील २०१५-१६ च्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या पूजा शेलार, कबड्डीतील शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजू घुले, सायकलिंगमधील २००३-०४ च्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मीनाक्षी शिंदे, जलतरणमधील २०२०-२१ च्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या वैष्णवी जगताप तसेच कबड्डीमधील २०२३-२४ चे शिवछत्रपती पुरस्कार विजेते विराज लांडगे यांचा समावेश होता.