कोल्हापुरात गावठी बॉम्ब बनवणाऱ्या दोघांना अटक

0
388

कोल्हापूर, दि. २३ (पीसीबी) – जंगली प्राण्यांच्या शिकारीसाठी गावठी बॉम्ब बनवणाऱ्या दोघांकडून साहित्य आणि ६९ जिवंत गावठी बॉम्ब हस्तगत करण्यात आले . हातकणगले येथील माले मुडशिंगी गावात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री ही कारवाई करत दोघांना  अटक केली आहे.  १८ ऑक्टोबर रोजी उजळाईवाडी येथील उड्डाणपुलाखाली झालेल्या स्फोटाप्रकरणी या  दोघांकडे चौकशी करण्यात येत आहे.

विलास राजाराम जाधव आणि आनंदा राजाराम जाधव (रा. माले मुडशिंगी)  अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

राष्ट्रीय महामार्गावरील उजळाईवाडी येथील उड्डाणपुलाखाली शुक्रवारी रात्री अज्ञाताने रस्त्यावर ठेवलेल्या वस्तूचा स्फोट होऊन ट्रक चालक  दत्तात्रय गणपती पाटील यांचा मृत्यू झाला  होता. या स्फोटाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष माने व हरिष पाटील यांना माले मुडशिंगी गावात गावठी बॉम्ब  माहिती मिळाली होती.

विलास जाधव, आनंदा जाधव जंगली जनावरांच्या शिकारीसाठी राहत्या घरी गावठी बॉम्ब बनवून त्याची विक्री करत होते. पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली असता घरात गावठी बाँम्ब बनवण्याच्या साहित्यासह पांढऱ्या व गडद तपकिरी रंगाचे एकूण ६९ जिवंत गावठी बाँम्ब असा एकूण सुमारे ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.