मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आज १२ ते २ यावेळेत बंद

0
445

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) –  रस्ते वाहतूक विकास महामंडळाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज  (बुधवारी )  काही कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुण्याकडे येणारी वाहतूक दुपारी १२ ते २ यावेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.  द्रुतगती मार्गावरील वाहतूक वळविण्यात येणार  आहे, अशी माहिती  महामार्ग पोलिसांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून द्रुतगती मार्गावर बुधवारी दुपारी १२ ते २ यावेळेत काही कामे (ओव्हरहेड गँट्री) करण्यात येणार आहेत.  द्रुतगती मार्गावर पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर (किलोमीटर ८२) येथे हे काम करण्यात येईल. त्यामुळे पुण्याकडे येणारी वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत.

मालवाहतूक करणारी अवजड वाहने द्रुतगती मार्गावरील खालापूर टोलनाका आणि कुसगाव टोलनाक्यापूर्वी थांबविण्यात येणार आहेत. हलकी आणि चारचाकी प्रवासी वाहने द्रुतगती मार्गावरील कुसगाव टोलनाका येथून जुन्या मुंबई- पुणे महामार्गावरून पुण्याकडे वळविण्यात येणार आहेत, असे महामार्ग पोलिसांच्या पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी सांगितले.   पुण्याकडे येणाऱ्या वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मोहिते यांनी केले आहे.