कोरोना सारख्या महाभयंकर संकटात राज्य सरकारने एक साबण सुद्धा वाटप केली नाही-केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे

0
313

जालना, दि.१६ (पीसीबी) – कोरोना सारख्या महाभयंकर संकटात कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना राज्य सरकारकडून एक साबण सुद्धा वाटप झाली नसून राज्य सरकारमधील मंत्र्यांमध्येच वाद सुरू झाल्याचे मत केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना शहर व जालना ग्रामीण मधील भाजपा पदाधिकारी, डॉक्टर, वकील, व्यापारी यांच्याशी झूम ॲप द्वारे संवाद साधताना व्यक्त केली.

जालना शहर व ग्रामीण, भाजपा पदाधिकारी, व्यापारी, वकील, डॉक्टर यांच्याशी केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे व माजी मंत्री आ.अतुल सावे यांनी झूम ॲप द्वारे संवाद साधला. यावेळी संवाद साधताना ना.दानवे म्हणाले की 30 में २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला सहा वर्ष पूर्ण होत आहे, 2014 ते 2019 या कालावधीमध्ये केंद्र सरकारने चांगले काम केल्यामुळे जनतेने पुन्हा 2019 ला मोदी सरकारला स्पष्ट बहुमत देऊन निवडून दिले आहे. बहुमत दिल्यानंतर केंद्र सरकार ने कलम 370 रद्द करू असे आश्वासन दिले होते ते मोदीजींच्या सरकारने पूर्ण केले. एक देश एक संविधान करून दाखविले, पूर्वी कश्मीर चा झेंडा वेगळा भारताचा झेंडा वेगळा होता परंतु आता जम्मू-काश्मीर चा सुद्धा भारताचा झेंडा आहे, जम्मू-काश्मीरमध्ये जि.प, प.स. व ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत नव्हत्या परंतु कलम 370 रद्द केल्यामुळे अनेक मुस्लिम महिला तेथे जि.प. अध्यक्ष व सरपंच झाल्या असून त्यांनी सुद्धा मोदीजींच्या सरकारचे अभिनंदन केले आहे. मोदीजींच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक विविध विकासाच्या योजना राबविल्या व कोरोना सारख्या महाभयंकर संकटामध्ये सुद्धा महाराष्ट्र व देशाला मोठे पॅकेज देऊन दिलासा दिला, परंतु महाराष्ट्र सरकारने राज्यातील जनतेला साधी एक साबण सुद्धा वाटप केली नसून राज्यातील मंत्र्यांमध्येच त्यांच्या अधिकारावाचुनच भांडणे चालू असून मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर पूरग्रस्तांच्या भेटीला गेले परंतु त्यांनी शेतामध्ये जाऊन पाहणी न करता हेलिकॉप्टर मधूनच पाहणी केली व शेतकऱ्यांना कोणतीही घोषणा न करता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. तसेच मोदीजींच्या सरकार मध्ये राम मंदिराचा मुद्दा सुटला असून शिवसेनेने बांगलादेश देशातील घुसखोरांना हटावची मागणी केली होती परंतु कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत सलगी केल्यामुळे शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर झाला असून ते आता कॉंग्रेस राकाँच्या सुरात सूर मिसळत आहे.

यावेळी बोलताना माजी मंत्री आ.अतुल सावे म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने 2014 ते 2020 या काळात अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले त्यामध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा, आयुष्यमान भारत योजना, उज्वला गॅस योजना, पाच लाखापर्यंत मोफत वैद्यकीय योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजना अंतर्गत सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यावर जमा, शेतकऱ्यांना तीन हजार रुपये साठ वर्षानंतर निवृत्तीवेतन, एक देश एक टॅक्स, बचत गटांना दहा लाखावरून वीस लाखापर्यंत कर्ज, तीन तलाख रद्द, आत्मनिर्भर भारत, कोरोनासाठी केंद्राकडून आतापर्यंत 28 हजार 104 कोटींची मदत केली आहे. तसेच केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याने देशातील जनतेसाठी मोठ्या प्रमाणात अन्नधान्य वाटप केले, तीन महिन्यासाठी मोफत तांदूळ वाटप केले व जालना औरंगाबाद लोकसभा मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी सैनीटायझर व मास्क चे वाटप केल्याबद्दल ना.दानवे यांचे आभार मानले.

यावेळी जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे म्हणाले की, कोरोनाच्या अडचणी सोडविण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेहनत घेऊन कोरोना सारख्या संकटाला हरवून व देशातील जनतेला विश्वासात घेऊन यश निर्माण केले त्यामुळे जगामध्ये मोदीजींच्या निर्णयाचे स्वागत होत असून गेल्या सहा वर्षात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेऊन भारताचे नाव जगाच्या नकाशावर पोहचविले त्यामुळे भाजपा पदाधिकाऱ्याने केंद्र सरकारच्या योजना व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. यावेळी अशोक आण्णा पांगारकर यांनी नाव्ही व परीट समाजासाठी लॉकडाऊन मध्ये व्यवसाय बंद असल्यामुळे राज्य सरकार ने त्यांना कोणतीही मदत केली नाही त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी ना.दानवे यांच्याकडे केली. यावेळी जिल्हा अध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे, उप सभापती तथा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे, शहराध्यक्ष राजेश राऊत, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, जिल्हा सरचिटणीस बद्रीनाथ पठाडे, माजी शहराध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश जाधव, प्रशांत वाढेकर, अतिक खान, जेष्ठ वकील विपुल देशपांडे, बाबासाहेब कोलते, शशीकांत घुगे, शिवरतन मुंदडा, सोमनाथ गायकवाड, बाबुराव भवर, कैलास उबाळे, वसंत शिंदे, संजय आटोळे, बद्री वाघ, संजय डोंगरे, जालना शहरातील सर्व नगरसेवक, भाजपा पदाधिकारी, डॉक्टर, वकील, सि.ए. आदींनी झूम अॅप द्वारे मोबाईल चर्चे मध्ये ना.दानवे व माजी मंत्री अतुल सावे यांच्याशी संवाद साधला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी केले तर आभार भाजपा न.प. गटनेते अशोक पांगारकर यांनी मानले.