कोरोना संसर्गाची तिसरी लाट नेमकी कधी…

0
246

मुंंबई, दि. ६ (पीसीबी) : भारतात कोव्हिड 19 च्या तिसऱ्या लाटेचा पीक पॉईंट जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात बघायला मिळण्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्रात जानेवारी महिन्याच्या मध्यात कोरोनाची सर्वाधिक रुग्णवाढ बघायला मिळण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय. भारतीय विज्ञान संस्था आणि भारतीय सांख्यिकी संस्था बंगळुरु यांनी केलेल्या संशोधनातून हा दावा करण्यात आलाय.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला कोरोना संसर्गाची तिसरी लाट कमी होण्यास सुरुवात होण्याचा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. तज्ज्ञांकडून संशोधनाच्या मॉडेलनुसार संसर्ग, लसीकरण आणि कमी होत जाणारी प्रतिकारशक्ती विचारात घेत अंदाज बांधण्यात आलाय, ज्यामुळे लोकसंख्येच्या 30 टक्के, 60 किंवा 100 टक्के लोकं कोविड 19 विषाणूने संक्रमित झालेली असतील. संशोधकांनी दक्षिण आफ्रिकेतील व्हेरियंटचा वापर करत अभ्यास केलाय.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे. अशातच कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं देशाची चिंता आणखी वाढवली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 90 हजार 928 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच 325 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत जवळपास 56 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

जाणून घ्या देशातील कोरोनाची सद्यस्थितीबाबत..
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून दोन लाख 85 हजार 401 वर पोहोचली आहे. अशातच या महामारीत जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढून 4 लाख 82 हजार 876 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (बुधवारी) 19 हजार 206 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 43 लाख 411 हजार 9 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.