कोरोना मुळे पुण्यातील घरांची विक्री घसरली; नवे प्रकल्प नाहीत

0
277

पुणे, दि.३० (पीसीबी) :  कोविड -१९ च्या संकटामुळे निर्माण झालेली अर्थव्यवस्थेविषयीची अनिश्चितता आणि टाळेबंदी यामुळे एप्रिल ते जून यादरम्यान  पुण्यात घरांच्या विक्रीत मोठी घट झाली तसेच नवे गृहप्रकल्प जाहीर झाले नाहीत, असे प्रॉपटायगर डॉट कॉम च्या रिअल इन्साइट- दुसरी तिमाही २०२० या अहवालात म्हटले आहे.   प्रॉपटायगर डॉट कॉम ही एलारा टेक्नॉलॉजीज च्या मालकीची  वेबसाइट असून हाऊसिंग डॉट कॉम आणि मकान डॉटकॉम या दोन कंपन्याही एलारा समूहात आहेत.

पुण्यात २०२० च्या दुस-या तिमाहीत १२५१ नवी घरे उपलब्ध झाली. हा आकडा आधीच्या तिमाहीच्या तुलनेत ८६ टक्के कमी तर पूर्ण वर्षाच्या तुलनेत ९२ टक्क्यांनी कमी आहे. नव्याने उपलब्ध झालेल्या घरांपैकी अर्धी घरे ४५ लाख ते  ७५ लाख रुपये या किंमतीची होती. चिंचवड, वाकड आणि कोंढवा या तीनच भागात नवी घरे उपलब्ध झाली.

घरांच्या विक्रीत आधीच्या तिमाहीच्या तुलनेत ६८ टक्के तर गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ७४ टक्के घट  झाली. हिंजवडी आणि वाघोली  या भागात घरांची सर्वाधिक विक्री झाली. ग्राहकांचा सर्वाधिक मोठा कल दोन बेडरूम हॉल किचन घरांकडे होता आणि विकल्या गेलेल्या घरांपैकी दोन तृतीयांश घरे या श्रेणीतील होती.   दुस-या तिमाहीत विकल्या गेलेल्या घरांपैकी ६२ टक्के घरे ४५ लाख रुपये किंवा त्याहून कमी किमतीची होती.

हौसिंग डॉट कॉममकान डॉट कॉम आणि प्रॉपटायगर डॉट कॉमचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी मणी रंगराजन  म्हणाले की, कोरोना च्या परिस्थितीत अर्थव्यवस्थेविषयीची अनिश्चितता आणि रोजगारात झाले. घट यामुळे मागणीवर परिणाम होणार हे अपेक्षित होते. येत्या तिमाहींमध्येही मोठ्या संख्येने नवीन प्रकल्प सुरु होतील अशी शक्यता आम्हाला वाटत नाही. सध्या विकसक मागणी सुधारण्याची आणि तयार घरे विकली जाऊन रोकड क्षमतेत वाढ होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र विक्रीतील ही घसरण तात्पुरती आहे असे आम्हाला वाटते कारण माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे एक मोठे केंद्र म्हणून पुण्याचे महत्व कायमच राहणार आहे.

एक चांगली बाब म्हणजे  रिअल इस्टेट व्यवसाय झपाट्याने डिजिटायझेशन कडे वळत आहे आणि घरांना ऑनलाइन मागणी येण्याचे प्रमाण वाढत आहे.  त्याप्रमाणेच प्रकल्पाला व्हर्च्युअल पद्धतीने भेट देणे, ड्रोन मधून चित्रण, व्हिडीओ संभाषण आणि ऑनलाइन बुकिंग ची सोय या सगळ्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही श्री रंगराजन म्हणाले.  

इन्व्हेन्टरी ओव्हरहँग ३० महिन्याचा  

पुण्यात विक्री च्या प्रतीक्षेत असलेल्या घरांची संख्या १,३५,१२४ म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांहून कमी आहे. यापैकी तयार घरांचे  प्रमाण १६ टक्के आहे.  विक्री न झालेल्या घरांच्या संख्येत आठ मोठ्या शहरांत मुंबईपाठोपाठ पुण्याचा क्रम  लागतो. ही  सर्व घरे विकली जाण्यासाठी ३० महिन्यांचा कालावधी लागेल, असे प्रॉपटायगर च्या विश्लेषणात स्पष्ट झाले आहे.

घरांच्या किमतीत वाढ नाही  

जून २०१९ च्या तुलनेत घरांच्या किमती २ टक्क्यांनी वाढल्यानंतर पुण्यात घरांच्या सरासरी किमती ४,९५१ रुपये प्रति चौरस फूट यावर स्थिरावल्या आहेत.  हडपसर, खराडी  आणि ताथवडे या भागात किमतीत किंचित वाढ दिसून आली.