कोरोना काळात दांडियाचा कार्यक्रम घेतल्याप्रकरणी सोसायटीच्या पदाधिका-यांवर गुन्हा

0
304

आळंदी, दि. २२ (पीसीबी) – कोरोनाच्या काळात कोणत्याही प्रकारचे सण-उत्सव एकत्रित येऊन, गर्दी करून साजरे न करण्याचे शासनाचे आदेश असताना देखील आळंदी येथील एका सोसायटीमध्ये नवरात्रीच्या उत्सवानिमित्त दांडियाचा कार्यक्रम घेण्यात आला. याबाबत सोसायटीच्या पदाधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जलाराम पार्क हाऊसिंग सोसायटीचे प्रभारी सचिव प्रफुल्ल दत्तात्रय माळवदे, अध्यक्ष प्रताप विजू शेवाळकर, उपाध्यक्ष महादेव पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक मच्छिंद्र नागनाथ शेंडे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाच्या निर्णयानुसार नवरात्र उत्सवात गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच पोलीस आयुक्तांनी शहर परिसरात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करून आरोपींनी त्यांच्या सोसायटीमध्ये नवरात्रीच्या उत्सवानिमित्त जलाराम पार्क हाऊसिंग सोसायटीच्या आवारात 15 ते 20 महिला-पुरुषांना एकत्र जमवून दांडिया कार्यक्रम भरवला.
याबाबत पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188, 269, 270, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.