कोरोनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांच निधन

0
541

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – कोरोनाची लागण झालेले पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख (वय- ४८) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई, वडिल असा परिवार आहे. आकुर्डी गावठाण मधून आजवर तीन वेळा ते नगरसेवक म्हणून निवडूण आले होते. त्यांच्या निधनामुळे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पंधरा दिवसांपूर्वी जेष्ठ नगरसेवक आणि माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले होते.

नगरसेवक जावेद शेख यांना १६ जुलै रोजी कोरोनाचे निदान झाल्यानेआकुर्डी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना मधुमेह, रक्तदाबाचा विकार असल्याने कोरोना साठी केलेल्या उपचारांना त्यांचे शरिर साथ देत नव्हते. अखेर आठवड्यापु्वी त्यांना  पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये  दाखल करण्यात आले होते. तिथे आज सायंकाळी पाच वाजता त्यांचे निधन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः लक्ष घालून  त्यांच्या तब्बेतीबाबत डॉ. परवेझ ग्रॅन्ट यांच्याशी चर्चा केली होती. कोरोनाता प्रादुर्भाव पूर्ण शरिरात आणि विशेषतः किडनी पर्यंत झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

आकुर्डी गावठाण भागातून सलग तीन वेळा जावेद शेख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. गुन्हेगारी विश्वाला रामराम ठोकून त्यांनी पूर्णतः समाज कार्याला वाहून घेतल्याने नागरिकांनीही त्यांना चांगला प्रतिसाद दिला होता. महापालिका आणि राज्य सरकारच्या विविध योजना शालेय विद्यार्थी तसेच महिलांसाठी राबविण्याचे काम त्यांनी केले. आरटीई अंतर्गत मुलांना शालेय प्रवेशासाठी त्यांनी विशेष लक्ष पुरविले होते. त्यामुळे आकुर्डी परिसरातून त्यांच्याबद्दल जनमत तयार झाले होते. त्यांच्या निधनामुळे त्या परिसरावर शोककळा पसरली होती.आज रात्री ८ वाजता निगडी येथील दफन भूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. कारण धडाडीचे दोन नगरसेवक केवळ  कोरोना आजारातून एकाएकी निधन पावले. दोघेही अफाट जनसंपर्क असलेले कायम निवडूण येणारे आणि कार्यक्षम नगरसेवक अशी ख्याती असलेले नगरसेवक होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली.  आजवर तीन वेळा नगरसेवक झाले पण त्यांना एकही पद मिळालेले नाही. त्यामुळे नव्याने नियुक्त होणाऱ्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शेख यांचे नाव चर्चेत होते, पण आता त्यांचे ते स्वप्न अपूर्ण राहिले आहे.