कोरोनाचा धोका टळलेला नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
342

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) : कोरोना संकटाच्या या काळात अनेक प्रेरक गोष्टी पुढे आल्या आहेत. मात्र, अजून कोरोनाचा धोका टळलेला नाही, तो आजही तेवढाच घातक जेवढा तो सुरुवातीला होता, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशातील सर्वात गरीब, शेवटच्या व्यक्तीबाबत विचार करा, असंही ते यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्य दिनी कोरोनाशी लढण्याचा, स्वावलंबी भारत बनवण्याचा आणि नाविण्यपूर्ण कामे करण्याचा संकल्प करूया, असंही मोदी म्हणाले.

कारगिल युद्धात शहीद झालेल्या शूर जवानांना सलाम
कारगिल युद्धाची वीस वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमिवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, कारगिलमधील भारताचे शौर्य संपूर्ण जगाने पाहिले आहे. पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला होता. विनाकारण सर्वांशी शत्रुत्व घेणे हे दुष्टांचा स्वभाव असतो, असंही मोदी म्हणाले. कारगिलला भेट देणे हा माझ्या जीवनातील अनमोल क्षण होता, असंही ते म्हणाले.

पाकिस्तानकडून पाठीत खंजिर खुपसण्याचा प्रयत्न केला गेला

मोदी म्हणाले की, 21 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतीय लष्करानं विजयाचा झेंडा फडकावला होता. कारगिल युद्ध ज्या परिस्थितीमध्ये झालं, ते भारत कधीही विसरू शकत नाही. पाकिस्ताननं मोठंमोठं मनसुबे ठेवून भारताच्या भूमीवर कब्जा करण्यासाठी आणि स्वतःच्या देशातील अंतर्गत कलहांवरून लक्ष हटवण्यासाठी हे धाडस केलं होतं. भारत त्यावेळी पाकिस्तानसोबत चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत म्हणून प्रयत्न करत होता. पण म्हणतात ना दुष्टाचा स्वभावचं असतो की, प्रत्येकाशी कोणतंही कारण नसताना शत्रुत्व करणं. अशा स्वभावाचे लोकं जे चांगलं करतात, त्यांच्याही नुकसानीचा विचार करतात. त्यामुळेच भारताकडून मैत्रीचे प्रयत्न होत असताना पाकिस्तानकडून पाठीत खंजिर खुपसण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यानंतर भारताच्या पराक्रमी सैन्यानं आपली ताकद दाखवून दिली, असं मोदी म्हणाले. मोदी म्हणाले की, हे सगळं संपूर्ण जगानं बघितलं. तुम्ही कल्पना करू शकता, उंच पहाडांवर असलेला शत्रू आणि खालून लढणारं भारताचं लष्कर. पण विजय पहाडांचा नाही झाला, तर भारताच्या खऱ्या शौर्याची झाला, असं मोदी म्हणाले.

बिहार, आसाममध्ये पूराने जीवन अस्तव्यस्त केले आहे- एकीकडे करोनाचे संकट, तर दुसरीकडे पुराचे संकट आहे, केंद्र आणि राज्य सरकारे या संकटांशी लढत आहेत, असं मोदींनी सांगितलं.

यावेळी मोदींनी तामिळनाडूतील नमक्कल येथील कनिका, पानीपतमधील कृतिका, केरळमधील एर्नाकुलम येथील विनायक आणि उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील उस्मान या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

गेल्यावेळच्या मन की बातमध्ये मोदी यांनी भारत संरक्षणक्षेत्रात पुढे जात आहे. भारत मैत्री करणे जाणतो आणि उत्तर देणे ही जाणतो, अशा शब्दात चीनला गर्भित इशारा दिला होता. ते म्हणाले होते की, आम्ही जे काही करतो, ती देशसेवाच असते. आपला देश सक्षम आणि स्वावलंबी बनणे हीच शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल. भारतमातेकडे डोळे वर करून पाहणाऱ्यांना उत्तर मिळाले आहे. वीरपुत्रांच्या त्यागाचा आम्हाला अभिमान आहेत. या वीरपुत्रांचे माता-पिता धन्य आहेत, असं मोदी यावेळी म्हणाले होते.