कोट्यावधींचे कर्ज देण्याच्या बहाण्याने नागरिकांना लुटणा-या तिघांना अटक

0
220

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – कोट्यावधी रुपयांचे कर्ज देण्याचा बहाणा करून नागरिकांकडून पैसे लुटणा-या तिघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. या टोळीने बाणेर आणि नवी मुंबई येथे कार्यालये सुरु करून अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरु आहे.

जलाराम इंटरप्रायजेस लिमिटेडची मॅनेजर महिला, संदीप रामचंद्र समुद्रे (वय 37, रा. कल्याण पूर्व, ठाणे), जयजित रामसनेही गुप्ता (वय 36, रा. डोंबिवली पश्चिम, कल्याण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी श्रीराम प्रल्हाद पिंगळे (वय 43, रा. कोथरूड, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मित्राला सोशल मीडियावर जलाराम इंटरप्रायजेस प्रायव्हेट फंड कंपनीकडून व्यवसायासाठी एक कोटीपासून कर्ज देण्याची जाहिरात आली होती. त्यावरून त्यांनी संपर्क साधला असता एका महिलेने बाणेर येथे बोलावून घेतले. एक कोटी रुपयांचे कर्ज हवे असेल तर पाच लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट द्यावे लागतील. ४५ दिवसात कर्ज दिले जाईल, असे महिलेने सांगितले. तिच्याबाबत संशय आल्याने फिर्यादी यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यांनतर हिंजवडी पोलिसांनी महिलेकडे चौकशी केली असता तिच्याकडे असलेली माहिती अपूर्ण आणि विश्वासपात्र नसल्याचे आढळले. त्यामुळे याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हिंजवडी पोलिसांनी बाणेर येथील कंपनीत जाऊन चौकशी केली असता आरोपी महिला तिथे मॅनेजर म्हणून काम करत होती. तिच्याकडे कंपनीचे रजिस्ट्रेशन, आरबीआयच्या नियमानुसार परवानगी नोंदणी नसल्याचे समोर आले. तसेच महिलेने सात महिलांना अपॉइंटमेंट लेटर न देता कामावर ठेवले होते. त्यामुळे पोलिसांनी मॅनेजर महिलेला अटक करून कंपनीचे १३ संगणक, सात मोबाईल फोन, दोन कर्ज प्रकरण संबंधित कागदपत्रे जप्त केली. आरोपी महिलेचा साथीदार संदीप समुद्रे आणि मालक जयजित गुप्ता या दोघांना देखील मुंबई मधून अटक केली. आरोपींनी नवी मुंबई येथे देखील अशा प्रकारचे कार्यालय सुरु करून अनेक नागरिकांची फसवणूक केली असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी नवी मुंबई पोलिसांना माहिती दिली आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख, सहाय्यक निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, उपनिरीक्षक रमेश पवार, सहाय्यक फौजदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, अंमलदार कैलास केंगले, योगेश शिंदे, बापू धुमाळ, विक्रम कुदळ, रितेश कोळी, अरुण नरळे, चंद्रकांत गडदे, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, अमर राणे, दत्ता शिंदे यांनी केली आहे.