कोचिंग क्लासेसचे मालक आणि विनोद तावडेंच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण; अनिल देशमुखांचा आरोप

0
353

मुंबई, दि. २७ (पीसीबी) –  कोचिंग क्लासेसचे मालक व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यामध्ये  मोठी   आर्थिक देवाणघेवाण झाली आहे. खाजगी शिकवणीबाबतचा मसुदा तयार असूनही तो पडून आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत केला.

शिक्षणमंत्री विनोद तावडे याकडे दुर्लक्ष करत असून यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून खासगी शिकवणी मसुद्याला तात्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणीही अनिल देशमुख यांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी सुरत येथे कोचिंग क्लासेसमध्ये भीषण आग लागण्याची दुर्दैवी घटना घडली. यामध्ये २० ते २२ मुलांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशात खळबळ उडाली. महाराष्ट्रात १ लाख १० हजारांच्यावर कोचिंग क्लासेस आहेत. त्यामध्ये मुंबईत ३० ते ३५ हजार कोचिंग क्लासेस आहेत, त्यांचे फायर ऑडिट होत नाही. आग लागली तर बाहेर पडायला जागा नाही. या क्लासेसवर कोणतेही निर्बंध नाही. कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत, असा आरोपही अनिल देशमुख यांनी केला आहे.