कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळली; ३३ जणांचा मृत्यू

0
1197

सातारा, दि. २८ (पीसीबी) –कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या पोलादपूरजवळी आंबेनळी घाटात एक खासगी बस कोसळली. ही बस २०० फूट दरीत कोसळली आहे. या बसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे ३४ जण होते. त्यापैकी ३३ जणांचा मृत्यू झाला असून फक्त एक जण बचावला आहे. दरीतील कोसळलेल्या बसमधील मृतदेह बाहेर काढण्याचे काम चालू आहे.

महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी आल्याने कर्मचारी दापोलीहून महाबळेश्वरला पिकनिकला निघाले होते. यासाठी त्यांनी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेतली होती. परंतु बस रायगडमधील पोलादपूर घाटात आल्यावर दरीत कोसळली.

दरवर्षी भाताची लावणी झाल्यानंतर कृषी विद्यापीठातील कर्मचारी पिकनिकला जातात. त्याप्रमाणे हे कर्मचारी आज (शनिवारी) सकाळी साडेसहाच्या सुमारास दापोलीहून महाळेश्वरला जाण्यासाठी निघाले. परंतु साडेदहा वाजता कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळल्याचा फोन आम्हाला आला. बसमध्ये ३४ कर्मचारी होते, त्यात महिला कर्मचारी नव्हत्या, अशी माहिती वरिष्ठ कृषी अधिकारी संजय भावे यांनी दिली.

दरम्यान, बस अपघाताची माहिती मिळताच सर्व यंत्रणा आणि महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुप कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी पोलादपूरला रवाना झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. बचावकार्य सुरु असले तरी पोलादपूर घाटातील वाहतुकीवर सध्या तरी सुरळीत आहे.