केलेल्या चुकीचा पश्चाताप होतो – संजय दत्त

0
414

मुंबई, दि.१३ (पीसीबी) – संजय दत्तच्या जीवनावर आधारित ‘संजू’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या बक्कळ कमाई करत असून हा चित्रपट लवकरच ३०० कोटींचा टप्पा गाठणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून संजयच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. मात्र तरीदेखील काही गोष्टी या अंधारात असल्याचे पाहायला मिळते. मात्र या साऱ्या गोष्टी संजय त्याच्या मुलाखतींच्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असल्याचे दिसून येत आहे.

१९९३ साली मुंबईमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये अनेक जणांना प्राण गमवावे लागले होते. विशेष म्हणजे या बॉम्बस्फोटामध्ये अभिनेता संजय दत्तच नाव पुढे आले होते. संजयने हा बॉम्बस्फोटामध्ये वापरण्यात आलेल्या एके -५६ जवळ बाळगल्याप्रकरणी त्याला शिक्षा झाली होती. याच धरतीवर आधारित ‘संजू’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आणि या चित्रपटानंतर संजयने त्याची चूक कबूल करत पश्चाताप होत असल्याचे म्हटलेय.

‘बॉम्बस्फोटावेळी एके-५६ जवळ बाळगणे ही माझी सर्वात मोठी चूक होती. मला माझी चूक मान्य असून मला त्याबद्दल पश्चातापही आहे. मात्र आता त्याच्या चुकीची शिक्षा भोगली आहे’,असे संजय म्हणाला. पुढे तो असेही म्हणाला, या एका चुकीमुळे माझे साऱ्य आयुष्य बदलून गेले होते. त्या काळात माझ्याबद्दल अनेक गोष्टी मीडियामध्ये पसरत होत्या त्यामुळे मला माझ्या चुकांची जास्त जाणीव होत होती. त्यामुळे त्या काळात मी जे काही मी भोगलंय ते माझ्या मुलांच्या वाट्याला येऊ नये यासाठी मी त्यांना कायम सांगत असतो की माझ्यासारखे होऊ नका. कारण माझ्याप्रमाणे त्यांच्या आयुष्यात समस्या निर्माण होऊ नये एवढेच वाटते’.