केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना करोनाची लागण

0
246

मुंबई,दि.२७(पीसीबी) – केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांना करोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांना करोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

माझ्या संपर्कात जे लोक आले आहेत त्यांनी करोनाची चाचणी करुन घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. करोनाची साथ नव्यानेच आली होती तेव्हा गो करोना करोना गो अशी घोषणा दिल्याने रामदास आठवले हे चांगलेच चर्चेत आले होते. मुंबईतील नरीमन पॉईंट या ठिकाणी त्यांनी या घोषणा त्यावेळी दिल्या होत्या. आता रामदास आठवलेंना करोनाने गाठलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ते खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

दरम्यान रामदास आठवले यांना करोनाची लक्षणे नाहीत. कार्यकर्त्यांनी व चाहत्यांनी काळजी करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार मुंबईत एका खासगी रुग्णालयात चार दिवसांसाठी दाखल होणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे आणि शासकीय बैठकांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे रिपाइंच्या वतीने अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.