केंद्राकडून पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीसाठी रु.४९ कोटीचा निधी राज्य सरकारकडे वर्ग

0
257

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – केंद्र शासन पुरस्कृत स्मार्टसिटी अभियानांतर्गत तिस-या टप्प्यात निवड झालेल्या पिंपरी चिंचवड शहराकरीता केंद्र शासनाकडून स्मार्ट सिटी अंतर्गत येणा-या विविध विकासकामे, प्रशासकीय व कार्यालयीन खर्चासाठीचा तिस-या हप्तातील उर्वरित र.रु. ४९ कोटी इतका प्रकल्प निधी राज्य शासनाकडे वर्ग करण्यात आला आहे. याबाबत भारत सरकार गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि.कडे पत्र प्राप्त झाले आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी दिली.

गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, सरकारच्या वतीने आयोजित स्मार्ट सिटी चॅलेंजच्या तिस-या फेरीमध्ये भारत सरकारने स्मार्ट सिटी मिशन (एससीएम) अंतर्गत पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी स्मार्ट प्रपोजल (एससीपी) ची निवड होवून पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार, आतापर्यंत एकूण प्रकल्पांपैकी ९ प्रकल्प पूर्ण झाले असून शहरातील विविध भागांमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकास प्रकल्पांची कामे सूरू आहेत. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी १ हजार कोटी रुपये निधीचा विकास आराखडा मंजूर आहे. त्यापैकी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीला आतापर्यंत र.रु.६८५.८४ कोटी निधी मिळाला आहे. केंद्र शासन ५० टक्के, राज्य शासन २५ टक्के आणि पिंपरी चिंचवड महापालिका २५ टक्के असा एकूण निधी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत येणा-या विविध विकासकामांकरीता उपलब्ध् केला जातो. त्याअनुषंगाने स्मार्ट सिटी अंतर्गत सूरू असलेल्या विकासकामांसाठी केंद्र शासनाकडे निधीच्या मागणीनुसार तिस-या वर्षातील उर्वरित प्रकल्पनिधी र.रु. ४६.५० कोटी तर प्रशासकीय व कार्यालयीन खर्चाकरिता र.रु. २.५० कोटी रुपये असे एकूण ४९ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडे वर्ग झाला आहे. या निधी सोबतच राज्य शासन आपल्या हिश्याची रक्कम जोडून पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे आठ दिवसाच्या आत वर्ग करणार आहे. हा निधी स्मार्ट सिटी कडे उपलब्ध झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेचा स्वहिस्सा वर्ग करण्याची कार्यवाही सूरू होईल.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत तयार करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी प्रपोजलमध्ये एरिया बेस डेव्हलपमेंट (एबीडी ) आणि पॅन सिटी सोल्युशन (पॅन सिटी) हे दोन घटक असून त्यामध्ये अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. त्यानुसार स्मार्ट किओक्स, स्टार्टअप इन्कयुबेशन सेंटर, सोलर पॉवर जनरेशन, बायसिकल शेअरिंग, म्युनिसिपल ई-क्लास रुम, सोलर पॉवर, स्कील डेव्हलमेंटर सेंटर, पब्लीक टॉयलेटस, सिटी मोबाईल ऍप अँड सोशल मिडीया ऍनेलिसीस हे प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित प्रकल्प प्रगती पथावर असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.