गुटखा वाहतूक प्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई

0
202

सोमाटणे फाटा, दि. ९ (पीसीबी) – गुटखा वाहतूक प्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करत सुमारे दोन लाख रुपये किमतीचा गुटखा पकडला. ही कारवाई बुधवारी (दि. 8) पहाटे सोमाटणे फाटा, सबवे जवळ करण्यात आली. या कारवाई मध्ये पोलिसांनी सुमारे दोन लाखांचा गुटखा तसेच एक ट्रॅव्हल्स हस्तगत केली आहे.

सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस हवालदार नितीन लोंढे यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, लक्ष्मणसिंग शंभूसिंग पवार (वय 39, रा. नागवाला, ता. घाटोल, जि. बासवाडा, राजस्थान), दिनेशसिंग रामसिंग राठोड (वय 35, रा. पादडी, ता. जि . डुंगरपूर, राजस्थान), नासीर मुन्सी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), नासीरचा मित्र (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमाटणे फाटा, सबवे जवळ एका ट्रॅव्हल्समध्ये गुटखा असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार एका पथकाने बुधवारी पहाटे साडेपाच वाजता कारवाई करून ट्रॅव्हल्स गाडी (जी जे 01 / डी झेड 0222) पकडली. पोलिसांनी पकडलेल्या ट्रॅव्हल्स गाडीमध्ये सुमारे दोन लाख रुपयांचा गुटखा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन लाखांचा गुटखा आणि 16 लाखांची ट्रॅव्हल्स गाडी जप्त केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी लक्ष्मणसिंग आणि दिनेशसिंग या दोघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.